दोडक्याने दिली संसारासह शेतकऱ्यांना उभारी
By Admin | Updated: October 19, 2015 00:01 IST2015-10-18T22:00:32+5:302015-10-19T00:01:21+5:30
वसोली : बुडित क्षेत्रात प्रेरणादायी शेतीचा मळा

दोडक्याने दिली संसारासह शेतकऱ्यांना उभारी
दीपक तारी -- शिवापूर--टाळंबा बुडित क्षेत्रामुळे दुर्लक्षिलेल्या व मुबलक पाणी पुरवठा असूनही विस्थापित होण्याच्या तसेच केव्हाही स्थलांतरीत होण्याच्या भीतीने आपल्या शेती व्यवसायाकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. या शेतकऱ्यांमधून पुढे येत आपल्या जमिनीत दोडक्याच्या भाजीचा मळा फुलवून शेतकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण करणारा वसोली-खालचीवाडी येथील दिगंबर तवटे दशक्रोशीतील शेतकऱ्यांना प्रेरणा बनून राहिला आहे. सन १९८१मध्ये टाळंबा धरणाची अधिसूचना निघाल्यानंतर बुडित क्षेत्रातील वसोली, उपवडे, साकिर्डे, हळदीचे नेरूर, चाफेली व पुळास गावातील शेतकऱ्यांमध्ये आपण आता विस्थापित होणार, आपल्याला केव्हाही स्थलांतरित व्हावे लागेल, या भीतीने शेतकऱ्यांनी आपल्या शेती, बागायतीकडे दुर्लक्ष केले. केवळ पोटापाण्यापुरती पारंपरिक शेती करून भात, नाचणी, कांदा, चवळी अशी पिके घेऊ लागले. मुबलक पाणी असूनही आपण पारंपरिक शेतीबरोबर व्यापारी पिके घेऊन चांगल्या प्रकारे पैसा कमवून आपला सर्वांगीण विकास करू शकतो. गेली ३५ वर्षे या भागातील शेतकऱ्यांनी व्यापारी पिके, फळभाज्या, लागवडीचे कधी धाडसच केले नव्हते. त्यांना एकच प्रश्न सतावत होता, तो म्हणजे आपण विस्थापित होणार. शासन कोणत्याही क्षणी आपले पुनर्वसन करू शकते, आपल्याला केव्हाही स्थलांतरीत व्हावे लागेल, या भीतीने मुबलक पाणी तसेच जमीन असूनही टाळंबा बुडित क्षेत्रातील शेतकरी विकासापासून ३५ वर्षे मागेच राहिले.
या सर्व गोष्टींना छेद देण्याचे काम केले ते म्हणजे वसोली (खालचीवाडी) येथील उद्यमशील नागरिक, तसेच वसोली विद्यालयाचे शिपाई दिगंबर तवटे यांनी. सुरुवातीपासून ते महत्त्वाकांक्षी होते. नेहमी वेगवेगळे प्रयोग करणे, विविध उद्योग करणे अशी दिगंबर तवटे यांची खासियत आहे. आपल्या शाळेचे काम प्रामाणिकपणे करून या व्यक्तीने सुरुवातीला या गावातील नागरिक अजित परब व रमेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली छोट्याशा जागेत पोल्ट्री व्यवसाय सुरू केला. आज जवळजवळ स्वत:च्या मालकीची १५०० कोंबडी आहेत. पोल्ट्रीची स्वमालकीची इमारत आहे. त्यानंतर गांडूळ खताचा व्यवसाय सुरू केला. जंगली श्वापदांच्या त्रासामुळे या भागातील लोक भुईमूग करण्याला धजावत नव्हते. परंतु, दिगंबर तवटे यांनी भुईमुगाची शेती करून तोसुद्धा प्रयोग यशस्वी करून दाखवला. आता या भागामध्ये भुईमुगाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. त्याचे श्रेय दिगंबर तवटेंना द्यावे लागेल. त्यानंतर गांडूळ खताच्या शेतीकडे लोक वळू लागल्याने तोसुद्धा प्रयोग त्यांनी आपल्या गावात केला. भुईमुगाबरोबर सूर्यफुलाची यशस्वी शेती करून या भागातील लोकांना सूर्यफूल शेतीकडे वळण्यासाठी उद्युक्त केले.
पाणी मुबलक असूनही आपले व्यापारी पिके का घेत नाहीत, असा प्रश्न नेहमी त्यांना भेडसावत होता. आपल्या जिल्ह्यामध्ये विलवडे, कास, मडुरा, रोणापाल, वेतोरे, माणगाव याठिकाणी बऱ्यापैकी भाजीपाल्याची शेती करून गोव्यातील म्हापसा या ठिकाणी तसेच आपल्या भागातील प्रमुख शहरातील बाजारामध्येही भाजी विकली जाते. आपल्या वसोली भागात अशाच प्रकारची भाजीपाल्याची शेती करून रोजगाराचे साधन मिळवू शकतो. यासाठी दिगंबर तवटे यांनी याचीही माहिती घेतली. यासाठी त्यांनी दोडक्याच्या भाजीचा मळा फुलवण्याचे निश्चित केले आणि त्यादृष्टीने काम सुरू केले.
बालपणापासूनच मला नवीन काहीतरी करायची आवड आहे. मी सुरूवातीला काजू, पोल्ट्री, भुईमूग आदी व्यवसाय केले. त्यानंतर वसोली पंचक्रोशीत प्रथमच भुईमूग आणि सूर्यफुलाची शेती सुरू करून लोकांसमोर आदर्श ठेवला. नंतर काही अनुभवी घाटमाथ्यावरील शेतकऱ्यांकडून दोडक्याच्या पिकाची शास्त्रशुद्ध माहिती घेऊन दोडक्याच्या भाजीचा मळा फुलविला. या मेहनतीतून मिळालेल्या फळावर मी समाधानी आहे. या भागातील शेतकऱ्यांनी भुईमूग, सूर्यफूल, दोडकी व अन्य व्यापारी पिके घेतल्यास नक्कीच आर्थिक विकास होईल.
- दिगंबर तवटे, शेतकरी, वसोली