उपेक्षितांपर्यंत ‘हेल्पलाईन’ पोहोचवण्याची धडपड
By Admin | Updated: January 29, 2015 23:38 IST2015-01-29T21:48:21+5:302015-01-29T23:38:04+5:30
निराधारांना मिळतेय जगण्याची उमेद...

उपेक्षितांपर्यंत ‘हेल्पलाईन’ पोहोचवण्याची धडपड
सामाजिक संस्था या समाजातील दुर्बल घटकांकरिता आधारस्तंभ ठरत आहेत. या संस्थांमुळे अशा दुर्बल घटकांना जगण्याची उमेद मिळत आहे. जगण्याचे बळ मिळत आहे. अशा निराधार व्यक्तिंना मदत करण्याच्या उद्देशाने विशेषत: निराधार, विधवा महिलांच्या मदतीला धावून जाण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या क्षेत्रातून एकत्र आलेल्या समविचारी व्यक्तिंच्या तळमळीतून रत्नागिरीत कोकण हेल्पलाईन असोसिएशनची स्थापना झाली. गेल्या १३ वर्षात असोसिएशनने शेकडो विधवा, निराधार महिलांना हजारो किलो धान्याचे मोफत वाटप केले आहे. त्याचबरोबर त्यांच्या मुलांनाही शैक्षणिक हातभार लावला आहे. एवढेच नव्हे; तर शासनाच्या अनेक योजना ग्रामीण भागातील उपेक्षित घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी माहितीपत्रकांच्या झेरॉक्सप्रती काढून त्याचे वाटप ही संस्था विनामोबदला करीत आहे.
जिल्ह्यात अनेक सामाजिक संस्था निराधारांसाठी तळमळीने कार्य करीत आहेत. रत्नागिरीतील सामाजिक कार्यकर्त्या वहिदा खान यांच्या पुढाकाराने ताहिरा काझी, जहांआरा शेख आणि अन्य कार्यकर्ते पीडित समाजासाठी काहीतरी करण्याच्या तळमळीतून एकत्र आले. त्यातूनच नोंदणीकृत संस्था चालविण्याची गरज निर्माण झाली. २००२ साली स्थापन झालेली कोकण हेल्पलाईन असोसिएशन २००३ साली नोंदणीकृत झाल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याला प्रारंभ झाला. संस्थेने ग्रामीण भागातील गरीब, गरजू लोकांच्या अडचणी लक्षात घेऊन आपले कार्य ग्रामीण भागात नेण्यास सुरूवात केली. पहिले ध्येय ठेवले ते निराधार विधवा महिलांना आधार देण्याचे. गावातील या वयस्कर विधवांची मुलं नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी जातात आणि या निराधार विधवा एकाकी आयुष्य जगतात. त्यामुळे अशांचा आधार व्हावे, या उद्देशाने संस्थेच्या कार्यकर्त्यांनी विविध ग्रामीण भागातील स्थानिक कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवला. त्यामुळे त्या भागातील विधवा महिलांची माहिती मिळू लागली. त्यांना महिना ३ किलोप्रमाणे मोफत धान्य पुरविण्यास संस्थेने सुरूवात केली. या महिलांना दिलासा मिळू लागला. घरातील चूल पेटू लागली. त्यांच्या मुलांनाही यथाशक्ती शैक्षणिक साहित्य तसेच कपडे, छत्र्या आणि इतर वस्तूंचीही मदत संस्थेकडून होऊ लागली. विशेष म्हणजे हा सर्व खर्च हे पदाधिकारी गेली १३ वर्षे पदरमोड करून करत आहेत. आतापर्यंत या संस्थेने कुठल्या देणगी वा निधीची अपेक्षा ठेवली नाही. संस्था स्थापनेपासून आतापर्यंत या संस्थेने जिल्ह्यातील ६०० निराधार विधवा महिलांना हजारो किलो धान्य मोफत पुरविले आहे. ज्या निराधार विधवा महिला कुणापुढेही हात न पसरता स्वाभिमानाने पण बिकट आर्थिक जीवन जगत आहेत.
या संस्थेने सोमेश्वर या गावाला दत्तक घेऊन तेथील अनेक गरजुंना मदत केली आहे. या गावातील अनेक विधवा महिलांना मोफत धान्य वाटप केले आहे. सोमेश्वर येथील उर्दु शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना गणवेशाचे मोफत वाटप केले आहे. एवढेच नव्हे; तर मुस्लिम महिलांनाही बचत गटाच्या माध्यमातून आपला आर्थिक विकास साधता यावा, यासाठी सोमेश्वरसारख्या मुस्लिमबहुल गावामध्ये ‘रत्नमाला महिला बचत गट’ स्थापन केला आहे. आता या महिला खऱ्या अर्थाने सक्षम होत असून, सोमेश्वर गावाच्या विकासासाठी प्रयत्न करीत आहेत.
‘सर्व धर्म समभाव’ जपणाऱ्या कोकण हेल्पलाईन असोसिएशनने इतर शासकीय संस्थांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या अनेक उपक्रमांमध्ये सहभाग दर्शविला आहे. मुलगी वाचवा अभियान, आरोग्य मार्गदर्शन शिबिर आदी उपक्रम संस्थेतर्फे राबविले गेले आहेत.
इतर समाजांप्रमाणे मुस्लिम समाजामध्ये अजूनही वधू - वर सूचक मंडळांसारखी संकल्पना नाही. मात्र, भविष्यात त्याची गरज लक्षात घेऊन वहिदा खान यांनी आता संस्थेतर्फे ‘हमसफर मॅरेज ब्युरो’च्या रूपाने ही संकल्पना वास्तवात आणली आहे. त्याला प्रतिसादही चांगल्या तऱ्हेने मिळू लागला आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून या संस्थेने राजिवडा येथील मत्स्य व्यवसाय शाळेला पाण्याचा पंप दिला. उपेक्षितांच्या गरजापूर्तीसाठी ही संस्था सातत्याने धडपडत आहे.
कोकण हेल्पलाईन असोसिएशन महिलांच्या सबलीकरणासाठी विशेष प्रयत्न करीत आहे. सबलीकरणासाठी बचत गट हे प्रभावी माध्यम असल्याने त्यावर अधिक भर देण्यात येणार असल्याचे या संस्थेच्या अध्यक्षा वहिदा खान सांगतात. येत्या ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या संस्थेतर्फे महिला बचत गटांच्या वस्तुंचे प्रदर्शन व विक्री प्रदर्शन आयोजित करण्याचा मानस आहे. याचाच एक भाग म्हणून यावर्षी महिला बचत गटांसाठी मोठ्या प्रमाणावर आंबा महोत्सव आयोजित करण्याचाही मानस खान या व्यक्त करतात. पण, या नवीन वर्षात संस्थेला अनेक आगळेवेगळे उपक्रम समाजातील काही घटकांच्या माध्यमातून राबवायचे आहेत. निराधार महिलांना आधार देऊ इच्छिणारी ही संस्था थोड्याच दिवसात माहेर संस्था तसेच रत्नागिरीतील शासकीय प्रतिभा महिला वसतिगृहाला भेट देऊन त्यांच्या गरजांविषयी माहिती करून घेणार आहे.
- शोभना कांबळे