दारूची वाहतूक; दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:23 IST2021-06-18T04:23:09+5:302021-06-18T04:23:09+5:30
लांजा : दुचाकीवरून विदेशी मद्याची बेकायदा वाहतूक करणाऱ्या दोघांना आय काॅप पथकाने पाठलाग करून गुरुवारी लांजा - साटवली ...

दारूची वाहतूक; दोघांना अटक
लांजा : दुचाकीवरून विदेशी मद्याची बेकायदा वाहतूक करणाऱ्या दोघांना आय काॅप पथकाने पाठलाग करून गुरुवारी लांजा - साटवली मार्गावर जावडे फाटा या ठिकाणी अटक केली. त्यांच्याकडून ३६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
लांजा पोलीस स्थानक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे आय कॉप युनिट कर्मचारी गुरुवारी दुपारी गस्त घालत असताना लांजा कुरूपवाडी रस्त्यावर दोघेजण दुचाकीने संशयास्पदरीत्या जाताना दिसले. पोलिसांनी त्यांना हटकले असता त्यांनी आपल्या दुचाकीने लांजा साटवलीमार्गे पलायन करण्याचा प्रयत्न केला. लांजा - साटवली मार्गावर जावडे फाटा याठिकाणी या दोघा दुचाकीस्वारांना थांबविण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता दुचाकीच्या पुढील भागात विदेशी मद्याच्या ४८ बाटल्या आढळल्या. पोलिसांनी नितीन चंद्रकांत कालकर आणि महेश नारायण नेमण (दाेघे रा. साटवली) यांना अटक केली. ही कारवाई लांजा उपविभागीय अधिकारी निवास साळोखे, लांजा पोलीस स्थानकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, पोलीस उपनिरीक्षक तेजस्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल दिनेश आखाडे, आय काॅपचे अंमलदार सुनील पडळकर तसेच कॉन्स्टेबल महेश जगताप, सुयोग वाडकर यांनी पार पाडली.