पारंपरिक बुरुड व्यवसाय अस्ताकडे

By Admin | Updated: February 6, 2015 00:45 IST2015-02-06T00:07:13+5:302015-02-06T00:45:00+5:30

प्रयत्नांची गरज : कोकणला प्रतिक्षा बांबू खरेदीदारांची, पुढे कोण येणार ?

Traditional Burund business | पारंपरिक बुरुड व्यवसाय अस्ताकडे

पारंपरिक बुरुड व्यवसाय अस्ताकडे

एजाज पटेल -फुणगूस -वाढत्या शहरीकरणामुळे पारंपारिक बुरुड व्यवसाय लोप पावत आहे. जिल्ह्याचा पर्यटन विकास झपाट्याने होत असताना, अनेक पारंपरिक कोकणी व्यवसायांना चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. या पारंपारिक बुरुड व्यवसायाला उर्जितावस्था आणण्यासाठी कोणतेच प्रयत्न होताना दिसून येत नाहीत.
मनिआॅर्डरचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या रत्नागिरीत ठराविक लोकच बुरुड व्यवसाय करीत होते. कालांतराने त्यांच्या नवीन पिढीनेही नोकरी उद्योगाची वाट धरली. कालांतराने या व्यवसायातही परजिल्ह्यातील कारागिरांनी शिरकाव केला. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, येथून पोटाची खळगी भरण्यासाठी कुटुंबासह आलेल्या या कारागिरांनी आपल्या हस्तकौशल्यातून सुबक, आकर्षक वस्तू बनवून लोकांचा विश्वास संपादन केला. या व्यवसायातून त्यांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाल्याने, त्यांच्याकडे पैसा खेळू लागला. शहरानजीकच्या मोकळ्या मैदानी जागेत या बुरुडांनी आपला तळ ठोकला. अनेक वर्षे झोपड्या बांधून राहिलेल्या या लोकांनी या व्यवसायात आपली मक्तेदारी निर्माण केली.
कोकणात बांबूचे पीक मुबलक प्रमाणात आहे. हा बांबू अत्यंत कमी किंमतीत खरेदी करून त्यापासून बांबूची बेळे काढून, अतिशय सुबक आकर्षक अशा टोपल्या, चटई, सुपे, रवळ्या तसेच शो-पीस बनवून, त्यांची शहराप्रमाणेच ग्रामीण भागात दारोदारी फिरून विक्री केली जात असे. अल्प गुंतवणूकीच्या या व्यवसायातून नफा मात्र दुप्पट मिळत असे. आज शहरातील बुरूड व्यावसायिक गायब झाले आहेत. मात्र, ग्रामीण भागातही त्यांचे दर्शन दुर्मिळ झाले आहेत.
जिल्ह्यात पर्यटनांचे वारे वाहत असताना पर्यटनाच्या माध्यमातून पारंपारिक व्यवसायांना चालना देण्याचा प्रयत्न होत असताना, येथील युवकांनी या व्यवसायाकडे वळणे आवश्यक आहे. पर्यटकांना आकर्षित करतील अशा नवनवीन शोभिवंत वस्तूंची निर्मिती बांबूपासून केल्यास आर्थिक उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण होईल. वाढती बेकारी, कर्ज घेऊन उद्योग सुरु करताना निर्माण होणाऱ्या अडचणी, यामुळे अनेक बेरोजगार वैफल्यग्रस्त आहेत. त्यांना अत्यंत कमी भांडवलात उत्पन्न मिळवून देणारा हा व्यवसाय फायदेशीर आहे. कोकणात बांबूचे पीक मुबलक; मात्र खरेदी करण्यासाठी समोर येत नसल्याने, याबाबत आता उपाय योजणे गरजेचे आहे. (वार्ताहर)

Web Title: Traditional Burund business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.