चिपळुणात कडक लॉकडाऊनला व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:24 IST2021-06-01T04:24:03+5:302021-06-01T04:24:03+5:30
चिपळूण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे येथील व्यापारी त्रस्त झाला आहे. त्यातच १ जूनपासून कडक लॉकडाऊन करण्याचे संकेत ...

चिपळुणात कडक लॉकडाऊनला व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध
चिपळूण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे येथील व्यापारी त्रस्त झाला आहे. त्यातच १ जूनपासून कडक लॉकडाऊन करण्याचे संकेत राज्य सरकारने दिले होेते. मात्र, या लॉकडाऊनला चिपळूण व्यापारी महासंघटनेने कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासन कडक लॉकडाऊन लागू करणार का व त्यावर व्यापारी कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काही दिवसांपूर्वीच येथील व्यापाऱ्यांनी संघटित होत नव्याने चिपळूण व्यापारी महासंघटनेची स्थापना केली. त्यानंतर या व्यापाऱ्यांची ऑनलाईन पद्धतीने बैठक होऊन लॉकडाऊनबाबतची भूमिका निश्चित केली. रविवारी राज्य सरकारने राज्यातील १५ जिल्ह्यांत कडक लॉकडाऊनचे संकेत दिले. त्यामध्ये रत्नागिरीचा समावेश असल्याने येथे १ जूनपासून कडक लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर येथील व्यापारी महासंघटनेने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार शेखर निकम व जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची भेट घेत भूमिका मांडली. आता व्यापाऱ्यांची कडक लॉकडाऊन स्वीकारण्याची क्षमता राहिलेली नाही. दोन महिने व्यापारी उद्योग व व्यवसायाअभावी मेटाकुटीस आले आहेत. अनेक छोट्या व्यापाऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. काहीजण कर्जबाजारी झाले आहेत. अशा परिस्थितीत कडक लॉकडाऊन करणे योग्य ठरणार नाही, असे म्हटले आहे़ खासदार राऊत व उच्च तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांना निवेदन देताना महासंघटनेचे अध्यक्ष शिरीष काटकर, कार्याध्यक्ष किशोर रेडिज, सरचिटणीस उदय ओतारी, अरुण भोजने, जिल्हाप्रमुख सचिन कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, विधानसभा क्षेत्राध्यक्ष बाळा कदम उपस्थित होते.