रत्नागिरी शहरात व्यापारी कोरोनाबाधित, घरडा कंपनीत आणखी १२ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 14:37 IST2020-07-23T13:42:52+5:302020-07-23T14:37:34+5:30
बुधवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार रत्नागिरीत नवे ४३ रूग्ण सापडल्याने जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या १,३७९ इतकी झाली होती. तर गुरूवारी सकाळी आणखी १२ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता कोरोनाबाधितांचा आकडा १,३९१ इतका झाला आहे. रत्नागिरी शहरातील एका कापड व्यापाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. दुर्दैवाने बुधवारी आणखी चार रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या ४६ झाली आहे.

रत्नागिरी शहरात व्यापारी कोरोनाबाधित, घरडा कंपनीत आणखी १२ पॉझिटिव्ह
रत्नागिरी : बुधवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार रत्नागिरीत नवे ४३ रूग्ण सापडल्याने जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या १,३७९ इतकी झाली होती. तर गुरूवारी सकाळी आणखी १२ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता कोरोनाबाधितांचा आकडा १,३९१ इतका झाला आहे. रत्नागिरी शहरातील एका कापड व्यापाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. दुर्दैवाने बुधवारी आणखी चार रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या ४६ झाली आहे.
बुधवारी दिवसभरात एकही रूग्ण वाढला नव्हता. मात्र, रात्री उशिरा आलेल्या अहवालात आणखी ४३ रूग्ण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यात जिल्हा रुग्णालयातील १९, कामथे उपजिल्हा रुग्णालयील १९, दापोली उपजिल्हा रूग्णालयातील २, तर घरडा (खेड) येथील ३ रुग्णांचा समावेश आहे. या अहवालात रत्नागिरी शहरातील एका कापड व्यापाऱ्याचा समावेश आहे.
या व्यापाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर बुधवारी आलेल्या अहवालांमध्ये एका खासगी रूग्णालयातील १, फणसोप येथील एकाच कुटुंबातील ४, खेडशी येथे १, मारूती मंदिर १, दामले स्कूलजवळ १, आंबेशेत १, तेली आळी ३, वांद्री (ता. संगमेश्वर), कर्ला १, कारवांचीवाडी १, निवळी १, कासारवेलीतील एका रुग्णाचा समावेश आहे.
बुधवारी दुर्दैवाने चार रूग्णांचा मृत्यू झाला. बुरोंडी (ता. दापोली) येथील ६० वर्षीय कोरोना रुग्णाचा, राजापुरातील ६५ वर्षीय वृद्धाचा आणि माजळ (ता. लांजा) येथील ५६ वर्षीय कोरोना रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रत्नागिरीत १७ जुलै रोजी अँटीजेन चाचणीत पॉझिटिव्ह आढळलेल्या ६८ वर्षीय महिलेचाही बुधवारी मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या आता ४६ झाली आहे.
जिल्हा रुग्णालयातून गुरूवारी सकाळी आलेल्या अहवालानुसार आणखी १२ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे सर्व अहवाल खेड तालुक्यातील घरडा कंपनीतील असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे घरडा कंपनीतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आणखी वाढ झाली आहे.
कोविड योद्धा गमावला
दापोलीतील एक माजी सैनिक निवृत्तीनंतर जिल्हा परिषद आरोग्य खात्यात कार्यरत होते. गेली अनेक वर्षे ते अत्यंत आस्थेने रूग्णसेवा करत होते. कोरोनाची लागण सुरू झाल्यापासून रूग्णालयात वाट्टेल त्या कामात ते सहभागी होत होते. दुर्दैवाने त्यांना लागण झाली आणि मुंबईत नानावटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील विभाग क्वारंटाईन
जिल्हाधिकारी कार्यालयातील एका प्रमुख विभागातील अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर तत्काळ या विभागाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. तर हा विभाग सील करण्यात आला असून, या विभागातील कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत.