फेरफटका - बॅटरीफुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:30 IST2021-03-20T04:30:23+5:302021-03-20T04:30:23+5:30
तर चिंतोपंताच्या सवयीमुळे मोबाईलची बॅटरी तर खराब होतेच होतेच, शिवाय लाईट खर्चही वाढतो हे आपल्या सर्वसामान्य लोकांच्या लक्षात ...

फेरफटका - बॅटरीफुल
तर चिंतोपंताच्या सवयीमुळे मोबाईलची बॅटरी तर खराब होतेच होतेच, शिवाय लाईट खर्चही वाढतो हे आपल्या सर्वसामान्य लोकांच्या लक्षात येत नाही. असो! तर हे आमचे चिंतोपंत म्हणजे एक भन्नाट माणूस. या माणसाकडे अनेक गोष्टी उपजतच असल्याने या गोष्टी लोकांना सतत कशा पुरवायच्या, याचा विचार करत असल्याने त्यातूनच मोबाईलचा शोध लागला असावा, असे आम्हास प्रामाणिकपणे वाटते. चिंतोपंताकडे उपदेश कसे करायचे, चुकलेल्याही माणसाला शिकवायचं कसे बरोबर, समोर आलेल्या माणसाला कसं शिकवायचं, याचं ज्ञान या माणसाकडे भन्नाट आहे. पण, त्यांची सौभाग्यवती अर्थात मिसेस चिंतोपंत हे त्यांच्या पुढचे अँड्रॉईड व्हर्जन आहेत. त्यांना कुणी शिकवायला जावं तर त्यापुढचे बोलतात. म्हणजे नेक्स्ट जनरेशन. कुणी म्हणाले, वहिनीसाहेब असं नाही तसं आहे, तर हमखास उत्तर ऐकायला यायचं. तसं नसतंच मुळी! इतकी वर्षे हे दोघे नवरा बायको एकत्रित राहिल्यामुळे भूगोल आणि भौतिक शास्त्राच्या अभ्यासाने आम्ही एवढेच सांगतो की, त्यांचा एकमेकांवर इतका प्रभाव पडलेला आहे, की तो लिहिण्यापलीकडे आहे. न्यूटनचे तीनही लॉ त्या दोघांपुढे माना खाली घालून उभे राहतील, अशी त्यांची स्थिती आहे. आतापर्यंत एवढं सांगितल्यावर आपणा सर्वांना या दोघांचा अंदाज आलाच असेल.
तर मुख्य मुद्याकडे येतो. झालं काय, मध्यरात्री दोन वाजता चिंतोपंताना सौभाग्यवतीच्या फोनवर कसल्या तरी मेसेजच्या आवाजाने जाग आली आणि ते उठले. त्यांनी सौभाग्यवतीचा मोबाईल हातात घेऊन पाहू लागले तर मेसेज असा होता. ब्युटीफुल. झालं चिंतोपंत भयानक आश्चर्यचकीत झाले. झोपलेल्या सौभाग्यवतीकडे पाहात मनाशी म्हणाले, एवढ्या मध्यरात्री कोण माणूस हिला ब्यूटीफुल म्हणाला असेल? बरं, ही कोणत्या अँगलने ब्युटीफुल दिसते? मग आतापर्यंत मला का दिसली नाही? एक ना दोन हजार प्रश्न चिंतोपंताच्या टक्कल पडलेल्या एवढ्याशा डोक्यात पडले. तशी त्यांच्या सौभाग्यवतीला आली जाग. मग त्या जोराने खेकासल्या, डोकं फिरलंय का तुमचे? मध्यरात्र होऊन गेली नि माझा मोबाईल डोळे फाडून काय बघता? तसं चिंतोपंत म्हणाले. अगं तुझ्या मोबाईलवर कोणाचा तरी ब्यूटीफुल मेसेज आला म्हणून विचारात होतो. मग तिने रागारागाने मोबाईल हिसकावून घेतला. त्यावरचा मेसेज वाचला, नि म्हणाली, येडं का खुळं वो तुम्ही? आहो बॅटरीफुल असा मेसेज आहे. जरा चष्मा लावून वाचत जावा नीट. माझंच चुकलं ८ वाजता मोबाईल चार्जिंगला लावलेला. झोपा आता गप गुमान. म्हणे ब्युटीफुल! आता मॉरल ऑफ स्टोरी काय तर रात्रभर मोबाईल चार्जिंगला लावू नये. लावला तर दुसऱ्याचे मेसेज बघू नये आणि बघितलं तर चष्म्याशिवाय बघू नये. नाहीतर चिंतोपंतासारखी बॅटरीफुल व्हायची. हा... हा... हा...
- डॉ. गजानन पाटील