चिपळुणात आज मराठा वादळ
By Admin | Updated: October 15, 2016 23:17 IST2016-10-15T23:17:58+5:302016-10-15T23:17:58+5:30
लाखोंचा जनसागर मोर्चात येणार : राष्ट्रीय महामार्ग दिवसभर बंद राहणार

चिपळुणात आज मराठा वादळ
चिपळूण : कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना तत्काळ शिक्षा व्हावी, अट्रॉसिटी कायद्यात बदल करावा, यासह विविध मागण्यांसाठी मराठा समाजातर्फे आज, रविवारी चिपळूण येथे रत्नागिरी जिल्हा मराठा मूक क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे. गेले काही दिवस जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांत या मोर्चाबाबाबत जनजागृती सुरू असल्याने लाखो लोक या मोर्चात सहभागी होतील, असा अंदाज आहे. हा मोर्चा महामार्गावरून प्रांताधिकारी कार्यालयात जाणार असल्याने दिवसभर महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
चिपळूण शहरातील मध्यवर्ती अशा पवन तलाव मैदानावर सर्व मराठा बांधव एकत्र जमणार असून, ११ वाजता तेथून मोर्चाला सुरुवात होईल. हा मोर्चा चिपळूण-कऱ्हाड मार्गावरून बहादूर शेख नाक्यावर येईल. तेथून हा मोर्चा मुंबई-गोवा महामार्गावरून प्रांताधिकारी कार्यालयाकडे जाईल.
चिपळूण-कऱ्हाड मार्ग तसेच मुंबई-गोवा महामार्गावर हा मोर्चा बराच काळ राहणार असल्याने हे दोन्ही मार्ग दिवसभरासाठी बंद करण्यात आले आहेत. मुंबई-गोवा महामार्ग अवजड वाहनांना शनिवारी रात्रीपासूनच बंद केला जाणार आहे. छोट्या गाड्यांना रविवारी सकाळी सहा वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत हा मार्ग बंद राहणार आहे. चिपळूण-कऱ्हाड मार्गावरील वाहतूकही दिवसभरासाठी वळविण्यात आली आहे. या मोर्चाला रत्नागिरी जिल्ह्याप्रमाणेच रायगड, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर अशा लगतच्या जिल्ह्यांमधील मराठाबांधवही उपस्थित राहणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याने आजवर कधीही पाहिलेला नाही, असा मोर्चा निघणार आहे. या मोर्चासाठी सर्व क्षेत्रांतील मराठा बांधव पुढे सरसावले आहेत. असंख्य शिवसेवक मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तैनात ठेवण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)
--------------
जिकडे तिकडे भगवाच-भगवा
राज्यभरात निघणाऱ्या मोर्चांमुळे रत्नागिरी जिल्ह्यातही आधीपासूनच वातावरणनिर्मिती झाली आहे. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील मराठा बांधवांनी विशेषत: तरुण वर्गाने पुढाकार घेत सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये तसेच मोठ्या गावांमध्ये जनजागृती रॅली काढल्या आहेत. त्यामुळे सर्वत्र वातावरण भगवेमय झाले आहे.
समाजबांधव सज्ज, मोर्चेकऱ्यांना स्वयंशिस्तीची आचारसंहिता
तरूणी राहणार अग्रभागी : जिल्ह््याच्या कानाकोपऱ्यातून लाखो मराठा बांधव होणार चिपळुणात दाखल
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याचा मराठा क्रांती मूक मोर्चा रविवार, दि. १६ रोजी चिपळूण येथील पवन तलाव ते प्रांताधिकारी कार्यालय असा काढण्यात येणार आहे. गेले कित्येक दिवस या मोर्चाची तयारी समाजबांधवांकडून सुरू आहे. त्यासाठी गावागावातून, वाड्यांमध्ये जावून मराठा बांधवांना मार्गदर्शन करण्यात आले होते. त्यानुसार उद्या चिपळूण येथे होणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी समस्त मराठा बांधव सज्ज झाले आहेत.
जिल्ह््यातील कानाकोपऱ्यातून समाजबांधव या मोर्चात सहभागी होणार आहेत. त्यामुळे कराड-चिपळूण, मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, राजापूर, लांजा, रत्नागिरी येथून मोठ्या प्रमाणावर समाजबांधव चिपळुणात दाखल होणार आहेत. एस्. टी. गाड्यांबरोबरच खासगी वाहनांनी मराठा बांधव येणार असल्यामुळे शहरापासून बाहेर एक किलोमीटर अंतरावर पार्किंग सुविधा करण्यात आली आहे. याठिकाणी गाड्या पार्किंग करून मराठा बांधव पवन तलावाकडे निघणार आहेत. पवन तलाव येथून सकाळी ११ वाजता या मोर्चाला प्रारंभ होणार आहे.
राज्यभरातील नियोजनानुसार मोर्चाच्या अग्रभागी तरूणी असणार आहेत. त्यानंतर सर्व स्त्रिया, त्यामागे शालेय विद्यार्थी, विविध क्षेत्रात कार्यरत असणारे बांधव, त्यामागे सर्वसामान्य मंडळी, शेवटी राजकीय नेते मंडळी राहणार आहेत. तर सर्वात शेवटी स्वयंसेवक असणार आहेत. मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला खाण्याचा डबा, पाण्याची बाटली आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर कोणताही कचरा आजूबाजूला न टाकता स्वत:जवळील जादा पिशवीत ठेवायचा आहे. मात्र, चुकून एखादा कागद पडला तरी मागून येणारे स्वयंसेवक ही सफाई करणार आहेत.
हा मोर्चा पवन तलाव येथून सुरू होणार असून, तेथून बहाद्दूरशेख नाका, मुंबई-गोवा महामार्गावरून प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाणार आहे. प्रांताधिकारी कार्यालय येथे पोहोचल्यानंतर दोन युवती मोर्चाला मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणाऱ्या निवेदनाचे वाचन केले जाणार आहे. त्यानंतर हे निवेदन मुलींचा गट जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणार आहे. राष्ट्रगीत झाल्यानंतर मोर्चाची सांगता होणार आहे. मोर्चाची सांगता झाल्यानंतर मोर्चातील सर्व बंधूभगिनी पार्किंग केलेल्या आपापल्या गाड्यांपर्यंत शांतपणे पोहोचून परतीच्या मार्गाला निघणार आहेत. (प्रतिनिधी)