टायर रिमोल्डिंग कारखाना बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:28 IST2021-03-22T04:28:24+5:302021-03-22T04:28:24+5:30
देवरुख : प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानुसार कोसुंब शाळेजवळ अनधिकृतपणे सुरू असलेला टायर रिमोल्डिंग कारखाना बंद करण्यात आला आहे. मागील ...

टायर रिमोल्डिंग कारखाना बंद
देवरुख : प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानुसार कोसुंब शाळेजवळ अनधिकृतपणे सुरू असलेला टायर रिमोल्डिंग कारखाना बंद करण्यात आला आहे. मागील ६ वर्षांपासूनची मागणी मंडळासह अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी पूर्ण केल्याबद्दल कोसुंब ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
बाजारात ग्राहकांची लूटमार
राजापूर : राजापुरात भरणाऱ्या आठवडा बाजारात येणाऱ्या बाहेरील व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची लूटमार सुरू आहे. वाढीव दराने मालाची विक्री केली जात असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. तसेच फळांवर केमिकल्सचा वापर करून विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार आठवडा बाजारात सुरू असूनही पालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे.
आरोग्य विभागातर्फे विशेष सभा
देवरुख : शिमगोत्सव, कोरोनाअंतर्गत कार्यक्षेत्रात प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह जनजागृतीसाठी संगमेश्वर तालुका आरोग्य विभागामार्फत वैद्यकीय तपासणीची मोहीम २४ मार्चपासून सुरू करण्यात येणार आहे. ग्राम कृती दले पुन्हा कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
३३ घरटी संरक्षित
दापोली : मुरूड समुद्रकिनारी कासवाच्या पिलांचे नुकतेच जलार्पण करण्यात आले. आतापर्यंत सुमारे ५५ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. दरवर्षी मुरुडमध्ये ऑलिव्ह रिडले कासवाची अंडी सापडतात. येथील कासवमित्र ज्ञानेश्वर माने व सहकारी राजेश शिगवण यांनी कासवाची ३३ घरटी संरक्षित केली आहेत.
स्पेशल गाड्यांना मुदतवाढ
खेड : शिमगोत्सवात कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना उसळणारी गर्दी लक्षात घेऊन, चार फेस्टिव्हल सुपरफास्ट स्पेशल गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार दोन फेस्टिव्हल स्पेशल ३१ मार्चपासून व अन्य २ स्पेशल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून धावणार आहेत.
रस्त्याच्या कामात घोटाळा
रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा-देवरुख-संगमेश्वर या रस्त्याच्या कामात घोटाळा झाला आहे. त्याची सखोल चौकशी करून दोषी ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी राज्य सरकार आणि विरोधी पक्षाकडे केली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून कौतुक
मंडणगड : प्रशासनाच्या मदतीने अतिशय उत्तम, सांघिक कार्य करत अत्यंत लोकोपयोगी काम कुंबळे ग्रामीण बाजार व कुंबळे ग्रामपंचायतीने नवीन कार्यालयाच्या रूपाने साकारले आहे. हे काम लोकोपयोगी असल्याने दोन्ही उपक्रमांचे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी कौतुक केले आहे.
लोकवर्गणीचा प्रश्न निकाली
राजापूर : कशेळी फोडकरवाडी नळपाणी योजनेचा प्रश्न अखेर निकाली काढण्यात आला आहे. नागरिकांच्या आक्रमक भूमिकेमुळे लोकवर्गणी देण्याचा निर्णय देण्यात आला आहेे. कशेळी ग्रामपंचायत हद्दीतील फोडकरवाडी येथे १४ वर्षांपूर्वी नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. ही योजना १७ लाख रुपयांची होती.
शवविच्छेदन कक्ष बंदच
रत्नागिरी : देवरुख ग्रामीण रुग्णालयामध्ये येणाऱ्या एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास किंवा एखाद्या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे शवविच्छेदन करण्यासाठी देवरुखमधून १८ किलाेमीटर संगमेश्वरला जावे लागते. ही होणारी परवड थांबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.