तीन वर्षात तब्बल एक हजार सर्पांना जीवदान

By Admin | Updated: November 9, 2015 23:40 IST2015-11-09T21:09:16+5:302015-11-09T23:40:53+5:30

गणपतीपुळे परिसर : महाविद्यालयीन सर्पमित्रांची कौतुकास्पद कामगिरी

Three thousand snakes alive in three years | तीन वर्षात तब्बल एक हजार सर्पांना जीवदान

तीन वर्षात तब्बल एक हजार सर्पांना जीवदान

संजय रामाणी -- गणपतीपुळे -रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील रोहीत खेडेकर, पराग केदार, राज देवरुखकर या सर्पमित्र कॉलेज युवकांनी ३ वर्षात सुमारे १००० सर्पांना पकडून त्यांना जीवदान दिले आहे.गणपतीपुळे परिसरात विविध विकासकामे, जंगलतोड तसेच खोदाईची कामे सुरु आहेत. सरपटणाऱ्या प्राण्यांना त्यामुुळे आसरा नसल्याने मनुष्य वस्तीकडे या प्राण्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. या परिसरात नाग, धामण, घोणस, कांडर, अजगर, नाणेरी, हरणटोळ, फुरसे आदी जातीचे साप आढळतात.हे सर्प हातानेच पकडत असल्याचे पराग केदार याने सांगितले. गरज पडल्यासच स्टीकचा वापर केला जातो. ज्या ठिकाणी खूप अडचण असेल व हात पोहोचत नसेल तरच स्टीकचा वापर केला जातो, असे ते म्हणाले.गणपतीपुळे परिसरात या सर्पमित्रांमुळे सापविषयी असणारी भिती किंवा साप दिसल्यावर होणारा मोठा आरडाओरडा, घराशेजारी लाठ्या - काठ्या घेऊन सज्ज असणारा जमाव हे चित्र आता दिसून येत नाही. घरात किंवा परिसरात साप दिसल्यास या सर्पमित्रांना बोलावून या सापाला पकडले जाते. त्यामुळे या परिसरातील साप मारण्याचे प्रमाण ७५ टक्के कमी झाले असून, मागील ३ वर्षात हजार सापांना पकडून जंगलात सोडून दिले असल्याचे रोहीत खेडेकर याने सांगितले.साप पकडल्यानंतर धामण किंवा अजगर असल्यास पोत्यात ठेवण्यात येते तर नाग, कांडर, हरणटोळ, नाणेरी, फुरसे अशा प्रकारचे साप बरणीत किंवा बाटलीत ठेवले जातात. त्या बाटलीला किंवा बरणीला आवश्यक तेवढी भोके ठेवली जातात व लगेचच जिकडे लोकवस्ती नसेल व या सापांना जिकडे खाणं-पिणं मिळेल, अशा ठिकाणी सोडले जाते, असे केदार याने सांगितले.साप किंवा पक्षी जखमी झालेले आढळून आल्यास अशा प्राण्यांना पकडून त्यांच्यावर औषधोपचार करुन पुन्हा त्यांना सोडून दिले जाते. गरज भासल्यास रत्नागिरी येथील सर्पमित्र व प्राणीमित्र यांची मदत घेतली जात असल्याचे राज देवरुखकर याने सांगितले.या परिसरातील व्यक्तीला सर्पदंश झाल्यास दवाखान्यात येईपर्यंत प्राथमिक औषधोपचार केला जातो. तसेच विविध सर्पांविषयी ग्रामस्थांना माहिती दिली जाते. या कामाला परिसरातील ग्रामस्थांचे पाठबळ व शाबासकी मिळत असल्याचे गणपतीपुळे युवकांनी सांगितले.

गणपतीपुळे परिसरात विविध विकासकामे, जंगलतोड तसेच खोदाईची कामे सुरु.
सरपटणाऱ्या प्राण्यांचा मनुष्यवस्तीत वावर.
गणपतीपुळे परिसरात नाग, धामण, घोणस, कांडर, अजगर, नाणेरी, हरणटोळ, फुरसे आदी जातीचे साप.
ग्रामस्थांचे मिळतेय पाठबळ.

Web Title: Three thousand snakes alive in three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.