कोकणात दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई, तीन बांग्लादेशी घूसखोर ताब्यात
By संदीप बांद्रे | Updated: October 5, 2023 15:45 IST2023-10-05T15:45:11+5:302023-10-05T15:45:38+5:30
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड कागदपत्रे कोणत्या आधारे मिळवली

कोकणात दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई, तीन बांग्लादेशी घूसखोर ताब्यात
चिपळूण : बांग्लादेशातून भारतात खूसघोरी करून आलेल्या तिघांना चिपळूण शहरानजीकच्या खेर्डी येथून ताब्यात घेण्यात आले. गेले काही महिने ते तेथे वास्तव्यास होते. त्यांच्यावर रत्नागिरीतील दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करून बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. या तिघांकडून काही कागदपत्रे हस्तगत केले असून त्यांना न्यायालयात हजर केले असता ६ ऑक्टोंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
गुल्लू हुसेन मुल्ला (५६), जिलानी गुल्लू मुल्ला (२६), जॉनी गुल्लू मुल्ला (२९, तिघेही बांग्लादेश) अशी ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांच्याकडून मोबाईल, आधारकार्ड, पॅनकार्ड व निवडणूक ओळखपत्र अशी कागदपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. खेर्डी मोहल्ला येथील शिगवणवाडी परिसरात ते काही महिन्यांपासून वास्तव्य करीत होते. परंतू बाग्लादेश हून भारतात अवैधरित्या प्रवेश करून मुलखी अधिकाऱ्याच्या परवानगी शिवाय वास्तव्य करीत होते. याविषयीची रत्नागिरी दहशतवाद विरोधी पथकाला माहिती मिळताच त्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने मंगळवारी रात्री १०.३० वाजता कारवाई करून तिघांनाही ताब्यात घेतले. त्यानंतर बुधवारी त्यांची चौकशी करून तत्काळ गुन्हा दाखल केला.
पारपत्र अधिनियम ३ (ए) ६, परकीय नागरिक आदेश कायदा ३ (१) (ए) व विदेशी व्यक्ती अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे. रत्नागिरी दहशतवाद विरोधी पथकातील सहायक पोलिस निरीक्षक भरत पाटील, पोलिस हेड कॉन्स्टेबल उदय चांदणे, आशिष शेलार यांनी ही कारवाई केली. यानंतर या तिघांना चिपळूण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक संजय पाटील हे करीत आहेत.
कागदपत्रे कोणत्या आधारे मिळवली
मुळचे बांग्लादेशी असलेले गुल्लू मुल्ला व त्याच्या दोन्ही मुलांकडे भारतीय नागरिकांप्रमाणे आधार कार्ड, निवडणूक मतदार असलेले ओळखपत्र, पॅनकार्ड अशी कागदपत्रे आढळून आली आहेत. त्यामुळे नागरीकत्व नसताना देखील ही कागदपत्रे कोणत्या आधारे त्यांनी मिळवली. तसेच या कागदपत्रांच्या आधारे त्यानी कोण-कोणते व्यवहार केले, असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. त्यामुळे पुढील पोलिस तपासात कोण-कोणत्या गोष्टी उघड होतात, याकडे लक्ष लागले आहे.