रत्नागिरी : तालुक्यातील काजरघाटी खुर्द बौद्धवाडी (ता. रत्नागिरी) येथे घराची चिऱ्याची संरक्षक भिंत तेथील दाेन झाेपड्यांवर काेसळून अडीच वर्षांच्या बालकासह तीन जखमी झाले आहेत. तसेच हरचिरी बौद्ध वाडी येथील सर्वेक्षणाअंती १३ घरांना धोका असल्याने त्यांच्या स्थलांतरासाठी शुक्रवारी प्रशासनाकडून लेखी सूचना देण्यात आल्या आहेत.काजरघाटी खुर्द बाैद्धवाडी येथील प्रवीण सोमा सिंग राठोड यांच्या घराची संरक्षक भिंत दाेन झाेपड्यांवर काेसळून नुकसान झाले. यामध्ये आशा अमर राठाेड (वय ४२), राेहन पिंटू जाधव (१६) आणि माेहन किसन राठाेड हा अडीच वर्षांचा बालक जखमी झाला आहे. हे सर्वजण रस्त्यावर काम करणारे मजूर असून, त्यांना तातडीने उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली आहे.
जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’
तालुक्यात शुक्रवारीही पावसाचा जाेर कायम हाेता. हवामान खात्याच्या अंदाजानुसार २२ ते २७ मे दरम्यान जिल्ह्यात किनारी भागात आणि काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पुढील चार दिवस जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.
वेगाने वारे वाहण्याची शक्यता यादरम्यान ४५ ते ५५ किमी प्रतितास या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. २४ ते २७ मे दरम्यान समुद्र अति खवळलेला राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांनी या कालावधीत समुद्रात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.स्थलांतराबाबत ग्रामस्थांसोबत बैठकतालुक्यातील हरचिरी बौद्ध वाडी येथील सर्वेक्षणाअंती १३ घरांना धोका असल्याचे निदर्शनात आल्याने या घरांना प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी स्थलांतराच्या लेखी सूचना शुक्रवारी (दि. २२) दिल्या. त्या अनुषंगाने रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतील हरचेरी बौद्धवाडीतील या १३ घरांमधील कुटुंबे स्थलांतरित करण्याबाबत हरचिरी बौद्धवाडीत दुपारी तहसीलदार राजाराम म्हात्रे आणि ग्रामीणचे पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव यांची या घर मालकांसोबत हरचिरी ग्रामपंचायत कार्यालयात सकारात्मक बैठक झाली. यावेळी बाधित कुटुंबांच्या घरकुल प्रस्तावाबाबतही चर्चा झाली.