कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी जिल्ह्यातील तीन संस्था निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:23 IST2021-05-28T04:23:53+5:302021-05-28T04:23:53+5:30

रत्नागिरी : कोविडच्या संसर्गामुळे आई-वडील दोघांचेही निधन झाल्यास त्यांच्यावर अवलंबून असलेल्या बालकांच्या जीवनावर गंभीर परिणाम होत असल्याने अशा बालकांच्या ...

Three institutions in the district fixed for children orphaned by corona | कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी जिल्ह्यातील तीन संस्था निश्चित

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी जिल्ह्यातील तीन संस्था निश्चित

रत्नागिरी : कोविडच्या संसर्गामुळे आई-वडील दोघांचेही निधन झाल्यास त्यांच्यावर अवलंबून असलेल्या बालकांच्या जीवनावर गंभीर परिणाम होत असल्याने अशा बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी जिल्हास्तरीय कृती दल (Task Force) स्थापन करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील तीन संस्था निश्चित करण्यात आल्या आहेत.

कोविड प्रादुर्भावाच्या काळात जिल्ह्यातील बालकांची काळजी व संरक्षणाचे काम करणाऱ्या संस्थांमधील बालकांना तसेच कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देतानाच त्यांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. कोविड आजारामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना सर्वतोपरी संरक्षण उपलब्ध करून देण्यात यावे तसेच बालकांना त्यांचे कायदेशीर हक्क मिळवून देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले आहेत.

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांकरिता जिल्ह्यातील ० ते १८ वयोगटातील मुलांकरिता कै. ना. प. अभ्यंकर निरीक्षणगृह-बालगृह, रत्नागिरी, ० ते १८ वयोगटातील मुलींकरिता कै. जानकीबाई आक्का तेंडुलकर महिलाश्रम संचलित मुलींचे निरीक्षणगृह-बालगृह, लांजा व ० ते ६ वयोगटातील मुलांकरिता भारतीय समाज सेवा केंद्र, चिपळूण (शिशुगृह) या ३ संस्था घोषित करण्यात आल्या आहेत.

कोरोनामुळे बालकाला काळजी व संरक्षणाची कुठलीही गरज भासत असल्यास चाईल्ड हेल्पलाईन १०९८, सेव्ह द चिल्ड्रन्स - ७४५३०१५५१८, अध्यक्ष, बालकल्याण समिती - ९८२२९८३६२०, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी - ९२२५८९२३२५, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय - ०२३५२ - २२०४६१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात येत आहे. या कृती दलाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी हे सदस्य सचिव तर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी हे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.

Web Title: Three institutions in the district fixed for children orphaned by corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.