रत्नागिरी शहरात आढळले तीन मृत पक्षी, तपासणीसाठी पुण्याला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 13:51 IST2021-01-15T13:50:07+5:302021-01-15T13:51:32+5:30
Bird Flu Ratnagiri- दापोली आणि गुहागरपाठोपाठ रत्नागिरी शहरात दोन दिवसात तीन मृत पक्षी आढळल्याने खळबळ उडाली आहे. हे तीनही मृत पक्षी तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली. पुणे येथे स्क्रिनिंग केल्यावर काही संशास्पद आढळल्यास ते पक्षी पुढील तपासणीसाठी भोपाळ येथे पाठविण्यात येणार आहेत.

रत्नागिरी शहरात आढळले तीन मृत पक्षी, तपासणीसाठी पुण्याला
रत्नागिरी : दापोली आणि गुहागरपाठोपाठ रत्नागिरी शहरात दोन दिवसात तीन मृत पक्षी आढळल्याने खळबळ उडाली आहे. हे तीनही मृत पक्षी तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली. पुणे येथे स्क्रिनिंग केल्यावर काही संशास्पद आढळल्यास ते पक्षी पुढील तपासणीसाठी भोपाळ येथे पाठविण्यात येणार आहेत.
रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार बुधवारी रात्रीच्या सुमाराला येथे एक टिटवी पक्षी मृतावस्थेत आढळला. याबाबत नगर परिषदेचे आरोग्य सभापती निमेश नायर यांनी तत्काळ संबंधित यंत्रणेला माहिती दिली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी गुरुवारी नगरसेवक बाबा नागवेकर यांच्या घराजवळ दोन मृत कावळे आढळले. कावळे मृत पावल्याची कल्पना पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. विवेक पनवेलकर यांना देताच त्यांची यंत्रणा सतर्क झाली.
याबाबत प्रशासनाकडून अथवा नगर परिषदेकडून पुढील कोणतीही पावले उचलण्यात आलेली नाहीत. पुणे येथून अहवाल आल्यानंतर त्याबाबत काही निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा केली जात आहे.
पशुसंवर्धन यंत्रणा सतर्क
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे १० ते १५ कावळे मृतावस्थेत आढळले होते. त्यांना बर्ड फ्लू झाल्याचे अहवालानंतर स्पष्ट झाले होते. त्यानंतर गुहागरात दोन कावळे मृतावस्थेत आढळले होते. दापोली, गुहागर पाठोपाठ आता रत्नागिरीतही पक्षी मृतावस्थेत आढळल्याने बर्ड फ्लूच्या भीतीमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. जिल्ह्यात मृत पक्षी आढळल्याने पशुसंवर्धनची यंत्रणा सतर्क झाली आहे.