मिऱ्याला सागरी आक्रमणाचा धोका
By Admin | Updated: June 11, 2014 00:43 IST2014-06-11T00:39:49+5:302014-06-11T00:43:18+5:30
बंधारा नादुरुस्त : पौर्णिमेला सागरी उधाणाचे पाणी

मिऱ्याला सागरी आक्रमणाचा धोका
रत्नागिरी : तालुक्यातील जाकीमिऱ्या या सागरी किनाऱ्यावरील धूपप्रतिबंधक बंधारा अनेक ठिकाणी कोसळलेला आहे. काही ठिकाणी दुरूस्तीच न झाल्याने पावसाळ्यात या गावातील किनाऱ्यावरील घरांना धोका निर्माण झाला आहे. येत्या पौर्णिमेला (१२ जून) येणाऱ्या सागरी उधाणाचे पाणी गावात घुसण्याची शक्यता असल्याने किनाऱ्यावर घरे असलेल्या लोकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या चार दिवसांपासून सागरातील पाणी खवळले असून, तुफानी लाटांचे तडाखे जाकीमिऱ्या भागाला बसत आहेत. विश्वदत्त पाटील यांच्या घराजवळील दगडी धूपबंधारा जागोजागी कोसळला आहे. त्यामुळे सध्या याठिकाणी असलेल्या घरांच्या आवारात सागरी लाटांचे पाणी घुसत असल्याचे पाटील यांनी या धूपबंधाऱ्याच्या पाहणीवेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, जाकीमिऱ्या भागात किनारपट्टीवर सुमारे साडेचारशे घरे आहेत. त्यातील सुमारे ५० घरे ही किनाऱ्याच्या खूप जवळ असून, त्यांना पावसाळ्यात सागरी आक्रमणाचा अधिक धोका आहे.
नऊ वर्षांपूर्वी येथे धूपबंधारा उभारण्यात आला. मात्र, तो योग्यप्रकारे न उभारल्याने व अत्यंत लहान दगड वापरले गेल्याने जागोजागी कोसळला आहे. सागरी लाटांचा मारा सहन करण्याची ताकद या लहान दगडांमध्ये नाही. त्यामुळे लाटांच्या धडकेने हे दगड पाण्यात वाहून गेले आहेत.
परिणामी जागोजागी बंधाऱ्याला भगदाडे पडली आहेत, असे पाटील यांनी सांगितले. गेल्या आॅक्टोबर महिन्यात पालकमंत्री उदय सामंत यांना या बंधाऱ्याची पाहणी करण्यासाठी बोलावले होते. त्यांनी पाहणी केल्यानंतर या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करू, असे त्यावेळी सांगितले होते. मात्र, त्यानंतरही येथे दुरुस्तीबाबत काहीच घडले नाही. त्यामुळे किनारपट्टीवरील घरात पावसाळ्याच्या उधाणामध्ये पाणी शिरण्याची भीती निर्माण झाल्याचे पाटील यांनी सांगितले.
जाकीमिऱ्यातील सागरी किनाऱ्यावरील धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची डागडुजी काही ठिकाणी झालेली नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी बंधारा कोसळला आहे. बागकरवाडी व मुरुगकरवाडी येथे मोठ्या प्रमाणात बंधारा कोसळला असल्याने पावसाळ्यात सागरी उधाणाचे पाणी गावात शिरण्याची भीती जाकीमिऱ्याचे सरपंच नार्वेकर यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)