हजार प्राथमिक शाळांना टाळे ?
By Admin | Updated: February 27, 2016 01:15 IST2016-02-27T01:15:29+5:302016-02-27T01:15:29+5:30
कमी पटसंख्येचा फटका : १४ हजार विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न

हजार प्राथमिक शाळांना टाळे ?
रहिम दलाल ल्ल रत्नागिरी
जिल्हा परिषदेच्या १ ते २० पटापर्यंतच्या १२४२ प्राथमिक शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे या शाळांमधील १३९९५ विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, त्याचबरोबर या शाळांतील अतिरिक्त ठरणाऱ्या २000 शिक्षकांना कुठे सामावून घेणार, असा प्रश्न निर्माण झाला असून, शिक्षकवर्गामध्ये अस्वस्थता पसरली आहे.
डोंगराळ, अतिदुर्गम भागातील अत्यल्प पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना आरटीईची फटका बसणार असल्याने शैक्षणिक क्षेत्रात याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे़ ग्रामीण भागातही खासगी शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक शाळांची संख्या वाढत चालली असून, त्याकडे पालकवर्ग आकर्षित होत आहे़ तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांच्या शैक्षणिक दर्जाबाबत नेहमीच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येते़ मात्र, आता खासगी शाळांपेक्षा जिल्हा परिषदेच्या शाळांच्या शैक्षणिक दर्जामध्ये कमालीची सुधारणा झाली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना अनेक शैक्षणिक सोयीसुविधा देण्यात येत असतानाही खासगी शाळांकडे विद्यार्थ्यांचा वाढता ओघ चिंता निर्माण करणारी आहे. जिल्हा परिषदेच्या १२४२ प्राथमिक शाळांची स्थिती फार बिकट झाली आहे.
१ ते २० पटसंख्या असलेल्या तालुकानिहाय जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा पुढील प्रमाणे आहेत.
या शाळांमध्ये १ पटसंख्या - ११ शाळा, २ पटसंख्या- ३३ शाळा, ३ पटसंख्या- ४६ शाळा, ४ पटसंख्या- ४६ शाळा, ५ पटसंख्या- ५४ शाळा, ६ पटसंख्या- ७३ शाळा, ७ पटसंख्या- ६७ शाळा, ८ पटसंख्या- ७१ शाळा, ९ पटसंख्या- ६६ शाळा, १० पटसंख्या- ६१ शाळा, ११ पटसंख्या- ९२ शाळा, १२ पटसंख्या- १०० शाळा, १३ पटसंख्या- ७८ शाळा, १४ पटसंख्या- ७९ शाळा, १५ पटसंख्या- ७४ शाळा, १६ पटसंख्या- ७५ शाळा, १७ पटसंख्या- ५६ शाळा, १८ पटसंख्या- ४७ शाळा, १९ पटसंख्या ५३ शाळा आणि २० पटसंख्या असलेल्या ६० शाळा आहेत़
जिल्हा परिषदेकडून पाठ्यपुस्तकांसह गणवेश देऊनही या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत़ त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात चिंता व्यक्त करण्यात येत आहे़ ० ते २० पर्यंत पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १२४२ प्राथमिक शाळा बंद होणार असून, या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या १३९९५ विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फटका बसणार आहे.
२०पर्यंत पटसंख्या असलेल्या शाळा बंद करुन त्या शाळांमधील विद्यार्थ्यांना जवळच्या शाळांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी त्या विद्यार्थ्यांचा वाहतूक खर्च देण्यात येणार आहे. तसेच निवास व्यवस्थाही करण्यात येणार आहे. मात्र, हा शासन निर्णय सर्वच जिल्ह्यांना लागू असला तरी रत्नागिरी जिल्ह्याची भौगोलिक स्थिती पाहता हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक ठरणार आहे.
दोन हजार शिक्षक : विद्यार्थ्यांना जवळच्या शाळांमध्ये सामावणार
१ ते २० पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या १२४२ शाळा लवकरच बंद होऊन त्या शाळांमधील १३९९५ विद्यार्थ्यांना जवळच्या शाळांमध्ये सामावून घेण्याचा शासनाचा निर्णय झाला आहे. यामुळे सुमारे २००० शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. शाळा बंद झाल्यास या शिक्षकांना जिल्हा परिषद शिक्षण विभाग कुठे सामावून घेणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शिक्षकांमध्येही अस्वस्थता पसरली आहे.
वेतन देणे परवडणारे नाही...
१ ते ६० पटसंख्येच्या शाळांसाठी २ शिक्षक देण्यात येतात. प्रत्येक शिक्षकाला सुमारे ३५ ते ४० हजार रुपये वेतन देण्यात येते. त्यामुळे १ ते ६० शाळांमधील शिक्षकांना वेतन देणे परवडणारे नाही. त्यापेक्षा विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता देणे परवडेल, असा विचार करून आर्थिक बचत करताना विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचारच करण्यात आलेला नाही.