प्रकल्पविराेधातील ‘त्या’ ठरावाला सूचक, अनुमाेदकच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:33 IST2021-09-03T04:33:21+5:302021-09-03T04:33:21+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प गुंडाळण्यात यश मिळाल्यानंतर आता बारसू - सोलगाव भाग रिफायनरी प्रकल्पासाठी पर्याय ...

The 'those' resolutions against the project are not indicative or predictable | प्रकल्पविराेधातील ‘त्या’ ठरावाला सूचक, अनुमाेदकच नाहीत

प्रकल्पविराेधातील ‘त्या’ ठरावाला सूचक, अनुमाेदकच नाहीत

लाेकमत न्यूज नेटवर्क

राजापूर : नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प गुंडाळण्यात यश मिळाल्यानंतर आता बारसू - सोलगाव भाग रिफायनरी प्रकल्पासाठी पर्याय म्हणून पुढे येत आहे. मात्र, प्रकल्पविरोधकांनी याठिकाणीही वेगवेगळे फंडे वापरून ग्रामस्थांत संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्यास सुरूवात केली आहे. बारसू-सोलगाव भागातील ज्या तीन ग्रामपंचायतींनी प्रकल्पविरोधाचे ठराव केले आहेत, असे प्रकल्पविरोधक भासवत आहेत. देवाचेगोठणे ग्रामपंचायतीने प्रकल्प विरोधाचा ठराव केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्या ठरावाला सूचक आणि अनुमोदकच नसल्याने हा ठरावच बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वेगवेगळ्या क्लुप्त्यांचा वापर करून प्रकल्पाची बाजू आम्हाला ऐकून घ्यायची नाही, असे ग्रामीण मंडळींकडून वदवून घेतले जाऊ लागले आहे. देवाचेगोठणे, सोलगाव, शिवणे खुर्द, गोवळ तसेच धोपेश्वर, बारसू, नाटे व राजवाडी अशा सात ग्रामपंचायतींचा संभाव्य प्रकल्प भागात समावेश आहे. यापैकी नाटे व राजवाडी या ग्रामपंचायतींनी यापूर्वीच प्रकल्पाला समर्थन दिले आहे. धोपेश्वरमधूनही प्रकल्पाची मागणी खासदार विनायक राऊत यांच्या भेटीत थेट सरपंचांनी लेखी पत्राद्वारे केली आहे.

गोवळ ग्रामपंचायतीतील एकूण नऊ सदस्यांपैकी सहा सदस्य हे गाव पॅनलचे तर तीन सदस्य शिवसेनेतून निवडून आले होते. गाव पॅनलच्या सहा सदस्यांनी काही दिवसांपूर्वीच भाजप नेते व माजी आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सोलगाव ग्रामपंचायतीने १९ फेब्रुवारी २०१९ रोजीच रिफायनरी समर्थनाचे पत्र दिलेले असून, खासदार विनायक राऊत यांच्या भेटीत ग्रामपंचायतीतील दोन ज्येष्ठ सदस्यांनी प्रकल्प राजापूर तालुक्यातच व्हावा, यासाठी त्यांना पत्रे दिलेली आहेत.

प्रकल्प भागातील ग्रामपंचायतींपैकी शिवणे खुर्द ग्रामपंचायतीने मात्र विरोधाचा ठराव केलेला आहे. पण, या गावातील काही जमीनमालकांनी मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अग्रेषित केलेल्या निवेदनाद्वारे जमिनींच्या दस्तऐवजासह संमत्तीपत्रे दिलेली आहेत. तसचे लगतच्या वसाहतीचा फायदा सर्व ग्रामस्थांना व्हावा, यासाठी लगतच्या पाच किलाेमीटर परिसरातील जागाही यामध्ये समाविष्ट करण्यात याव्यात, अशा आशयाचे सह्यांचे लेखी निवेदनही प्रांताधिकारी यांना दिलेले आहे. याठिकाणी एमआयडीसीसाठी २,३०० एकरची अधिसूचना यापूर्वीच निघालेली आहे.

----------------

पन्नासपेक्षा अधिक ग्रामपंचायतींची समर्थन पत्रे

रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातच व्हावा यासाठी तालुक्यातील एकूण १०१ ग्रामपंचायतींपैकी पन्नासपेक्षा अधिक ग्रामपंचायतींची समर्थनपत्रे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना पाठविण्यात आली आहेत. ही संख्या ७० पर्यंत जाईल, असा विश्वास प्रकल्प समर्थक समित्यांच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: The 'those' resolutions against the project are not indicative or predictable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.