बुरूडकामातून त्यांनी शोधला आयुष्यभराचा रोजगार
By Admin | Updated: August 14, 2014 22:39 IST2014-08-14T21:55:43+5:302014-08-14T22:39:44+5:30
उदरनिर्वाहाचे साधन : कष्ट करून उभा केला संसार..

बुरूडकामातून त्यांनी शोधला आयुष्यभराचा रोजगार
मनीष दळवी - असुर्डे --कलेला जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे़ ती जीवनात प्रकाश देऊन जीवन सुखकर करु शकते़ त्यामुळे कला ही जननी आहे़ फक्त त्यासाठी कष्ट करण्याची तयारी असावी लागते़ याचे ज्वलंत उदाहारण म्हणजे कोकरे येथील काशिनाथ सखाराम जाधव यांचे देता येईल. वयाच्या ६३व्या वर्षीही मानग्याच्या बांबूपासून सूप, रोवली, टोपली तसेच शेतीसाठी कणंग, डालगे, हारे, बैलांची टोपरी अशा एक ना अनेक वस्तू तयार करुन स्वत:चा उदरनिर्वाह करीत आहेत.
सध्याच्या पिढीत ही कला फारच थोड्या लोकांना अवगत आहे़ प्लास्टिकच्या जमान्यात या सर्व वस्तू कालबाह्य होत आहेत. परंतु पर्यावरणाचा विचार करता बांबूूंपासून बनविल्या जाणाऱ्या वस्तू वापरायची ही सक्ती शासनाने केली तर यामध्ये अनेक तरूण या बुरूडकामाकडे वळतील, असे जाधव यांचे म्हणणे आहे.
फिलिप्स कंपनीतली नोकरी सुटल्यावर काय करावे? असा प्रश्न त्यांच्यासमोर आवासून उभा होता़ पत्नी व दोन मुलांचा कसा सांंभाळ करावा, असा विचार मनात येत होता. यावेळी बुरंबाड येथील त्यांचे आजोबा कै. हरी गमरे हे बांबूपासून लोकांना नित्याच्या वापरातील वस्तू बनवून उदरनिर्वाह करीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी मनोमन ठरविले आणि बुरूडकाम व्यवसायाची त्यांनी मनापासून निवड केली़ आजोबांकडून त्यांनी ते कसब घेतले. हळूहळू सूप, रोवली, टोपल्या, डालगे, हारे आदी सर्व वस्तू ते बनवू लागले. त्यानंतर काही दिवसांत बुरूडकाम व्यवसायात ते पारंगत झाले. चार पैसे मिळू लागल्यावर जीवनात थोडीशी स्थिरता प्राप्त झाली. त्यामुळे त्यांनी स्वत:ला या कलेत झोकून दिले़
त्यानंतर दिवस-रात्र ते बुरूडकाम करु लागले़ मोठा मुलगा संतोष हा बारावी उत्तीर्ण, तर सतीश हा शिक्षक आहे़ डी. एड.पर्यंत शिकण्याची त्याची दांडगी इच्छा होती. परंतु हाती पैसा नव्हता. त्याची ही इच्छा कशी पूर्ण करावी, हा प्रश्न सतत भेडसावत होता. अशावेळी आबलोलीचे गजानन बाईत यांनी त्यांना मदत केली, असे जाधव सांगतात. एक सूप २०० रुपये किमतीला विकले जाते़ गौरी गणपतीमध्ये तर चार महिने आधीच मागणी नोंदविली जाते़ ५० रुपयांच्या मोठ्या बांबूमध्ये ४ सुपे विणली जातात, असा त्यांचा दावा आहे़ या व्यवसायातून चांगला रोजगार मिळू शकतो़, असे मत त्यांनी व्यक्त केले. (वार्ताहर)