रत्नागिरी : शालेय शिक्षण विभागाने जून २०२३ मध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, जुन्या शिक्षकांसाठी आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया गतवर्षी पुन्हा सुरू करण्यात आली होती. दरम्यान, चालू शैक्षणिक वर्षात ऑगस्ट महिना संपला तरी शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी शासनाकडून कोणतीही हालचाल अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे यंदा शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांना होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची आंतरजिल्हा बदली कायमची बंद करण्यात आली आहे. हा नियम नव्याने भरती होणाऱ्या शिक्षकांना लागू करण्यात आला असून, यापूर्वी भरती करण्यात आलेल्या शिक्षकांसाठी आंतरजिल्हा बदली प्रक्रिया शासनाकडून राबविण्यात येणार होती. दरम्यान, दरवर्षीप्रमाणे शासनाकडून पोर्टलवर आंतरजिल्हा बदलीसाठी इच्छुक असणाऱ्या शिक्षकांची माहिती ऑनलाइन पोर्टलवर भरण्यात येते.यंदाच्या शैक्षणिक वर्षात शासनाकडून अजूनही आंतरजिल्हा बदलीबाबतची पोर्टलवर माहिती भरण्यासाठी शासनाकडून कोणतेही कार्यवाही सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षांत शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या होणार नाहीत, हे निश्चित झाले आहे. त्यामुळे स्वगृही जाण्यासाठी इच्छुक असलेल्या शिक्षकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्तीसाठी रिक्त पदांची टक्केवारी १० टक्क्यांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. मात्र, ही अट आंतरजिल्हा बदली प्रक्रिया २०२४-२५ करीता शिथिल करण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित न जोपासता २ हजारपेक्षा जास्त पदे रिक्त असतानाही आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले होते.
यापुढे बदलीची संधी नाहीचयापुढे भरती होणाऱ्या नवीन शिक्षकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात बदलीची संधी मिळणार नाही. त्यांना सेवेतून निवृत्त होईपर्यत त्याच जिल्ह्यात काम करावे लागणार आहे. त्यासाठी त्यांनी शासनाला लेखी हमी द्यावी लागणार आहे. त्यामुळे नव्याने भरती होणाऱ्या शिक्षकांना आंतरजिल्हा बदली आता कायमस्वरुपी बंद करण्यात आली आहे, असा शासन निर्णय आहे.
कार्यमुक्त झालेले शिक्षक
- सन २०२३ - ७०७
- सन २०२४ - ३५०