दापोली : कोविडच्या तिसऱ्या लाटेची खबरदारी म्हणून आणि यामध्ये लहान मुलांना अधिक धोका संभविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे दापोली पंचायत समितीकडून लहान मुलांसाठी कोविड सेंटरची निर्मिती करण्यात येणार असून, त्याचे नियोजन सुरू असल्याचे पंचायत समिती सदस्य व शिवसेना गटनेते मनोज भांबिड यांनी सांगितले.
दापोली शहरातील वराडकर महाविद्यालय येथील मुलींच्या वसतिगृहामध्ये हे कोविड सेंटर तयार करण्यात येणार आहे. या सेंटरच्या कामाला नियोजन करण्यात येत असून, रंगरंगोटीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कोविड सेंटरमध्ये येणाऱ्या लहान मुलांना एखाद्या दवाखान्यात किंवा आपण आजारी आहोत असे वाटायला नको याकरिता जे शक्य होईल ते प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही भांबिड यांनी सांगितले. दापोली पंचायत समितीकडून लहान मुलांसाठी निर्माण करण्यात येणाऱ्या कोविड सेंटरला रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम स्थान मिळणार आहे. कारण हे जिल्ह्यात पहिले चिल्ड्रन कोविड सेंटर म्हणून गणले जाणार आहे. या कोविड सेंटरमध्ये सध्या ५० बेडची मर्यादा ठेवण्यात आली आहे. गरज भासल्यास बेडच्या संख्येत वाढ करण्यात येणार आहे. या केंद्रात लहान मुलांसोबत येणाऱ्या पालकांची कशा प्रकारे व्यवस्था करायची याचेही नियोजन सुरू असल्याचे मनोज भांबिड यांनी सांगितले.