सीईटी सेलला रत्नागिरीचे वावडे, विद्यार्थ्यांची फरफट; जिल्ह्यात दोनच केंद्र
By मेहरून नाकाडे | Updated: April 3, 2025 17:50 IST2025-04-03T17:49:16+5:302025-04-03T17:50:56+5:30
मेहरून नाकाडे रत्नागिरी : बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातील अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी प्रवेश घ्यायचा असेल तर एमएचटी ...

संग्रहित छाया
मेहरून नाकाडे
रत्नागिरी : बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातील अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी प्रवेश घ्यायचा असेल तर एमएचटी सीईटी परीक्षा द्यावी लागते. रत्नागिरी जिल्ह्यात दरवर्षी साडेपाच ते सहा हजार विद्यार्थी बारावी विज्ञान शाखेची परीक्षा देतात. मात्र रत्नागिरी हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असताना शहरात एकही परीक्षा केंद्र नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी फरफट तर होते, शिवाय पालकांना आर्थिक भुर्दंडही बसत आहे.
एमएचटी सीईटी परीक्षेसाठी अभ्यासक्रम हा बारावी विज्ञान अभ्यासक्रमासारखाच असतो. यात काही बदल नसतो. ही परीक्षा महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून घेतली जाते. अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भाैतिकशास्त्र, रसायनशास्त्र, किंवा गणित या तीन विषयातील दाेन विषयांचा पेपर द्यावा लागतो, तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रसायनशास्त्र, अर्थशास्त्र किंवा जीवशास्त्र या विषयाचा पेपर द्यावा लागतो.
आवश्यक सुविधा
ऑनलाईन परीक्षा घेण्यात येत असल्यामुळे त्यासाठी सुसज्ज अभियांत्रिकी महाविद्यालयाची आवश्यकता आहे. त्यामध्ये २०० ते ३०० संगणक, सर्व संगणक लॅन नेटवर्कमध्ये असणे आवश्यक आहे. त्याशिवाय उत्तम नेटवर्क, वीजप्रवाह खंडित झाल्यास तातडीने बॅकअप सुविधा, सीसीटीव्ही यंत्रणा, वाॅशरूम, परीक्षा घेण्यासाठी मनुष्यबळ या सर्व गोष्टींची आवश्यकता आहे. रत्नागिरी शहरात या सुविधा उपलब्ध असताना विद्यार्थ्यांना अन्य तालुक्यात जावे लागते, हे दुर्दैव आहे.
जिल्ह्यात दोन केंद्रच
रत्नागिरी शहर हे जिल्ह्याचे महत्वपूर्ण ठिकाण आहे. असे असताना व शहरात अभियांत्रिकी महाविद्यालय असतानाही परीक्षा न होता, भरणे (खेड) व गतवर्षीपासून खेर्डी (चिपळूण) येथे परीक्षा घेण्यात येत आहे. मंडणगड ते राजापूरपर्यंत जिल्ह्याचा विस्तार आहे. तेथील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी भरणे किंवा खेर्डी या केंद्रावर परीक्षेसाठी जावे लागत आहे.
दोन तास आधी रिपोर्टिंग
परीक्षेपूर्वी दोन तास आधी रिपोर्टिंग करावे लागते. त्यामुळे सकाळी ९ वाजता पेपर असला तर सात वाजता रिपोर्टिंग द्यावे लागते. परिणामी जिल्हाभरातून परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना एक तर परीक्षेच्या आदल्या दिवशी वस्तीला जावे लागते. अन्यथा पालकांना खासगी वाहनांसाठी पैसे मोजावे लागतात. एकूणच परीक्षा व्यवस्था नसल्यामुळे विद्यार्थ्यांची फरफट तर होते, पालकांनाही आर्थिक भुर्दंड बसत आहे.