अपंगत्त्वातही स्वावलंबनाची जिद्द कायम
By Admin | Updated: June 14, 2014 01:19 IST2014-06-14T01:19:29+5:302014-06-14T01:19:29+5:30
वंदना मांजरेकर : व्हीलचेअरवरूनच दिली आयुष्याला गती

अपंगत्त्वातही स्वावलंबनाची जिद्द कायम
शोभना कांबळे -रत्नागिरी
काहीअंशी अपंगत्व आलं तरी व्यक्ती मनाने खचते, तिची जगण्याची उमेद संपते. पण, तब्बल ३५ वर्षे अपंगत्व स्वीकारून व्हीलचेअरला जीवनसाथी मानून स्वावलंबनाची जिद्द बाळगणाऱ्या वंदना मांजरेकरची जिद्द वाखाणण्याजोगी आहे.
रत्नागिरी शहरात साळवी स्टॉप येथे वंदना मांजरेकर आपल्या आई - वडील आणि दोन भावांसमवेत राहायची. सुदृढ, चपळ, हसतमुख वंदना सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूलमध्ये दुसरीला असताना एके दिवशी बसमधून खाली पडली. तिच्या पायाला मार बसला. चुकीच्या उपचार पद्धतीमुळे तिच्या नशिबी अपंगत्व आलं. पण, वंदनाला तिची धडपड स्वस्थ बसू देईना. याही परिस्थितीत तिने आपले शिक्षण चालूच ठेवले. ती पाचवीत गेली. पण, नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. एक दिवस सायकल चालवताना ती पडली. आई सतत आजारी, वडिलांचे निधन, भाऊ रिक्षाचालक. आर्थिक दुर्बलतेमुळे तिला योग्य उपचार मिळाले नाहीत. शिक्षण थांबवावं लागलं. तरीही तिची शिक्षणाची तळमळ तिला गप्प बसू देईना. घरातूनच अभ्यास करत दहावीच्या परीक्षेला बाहेरून बसण्याची तयारी केली. पण, इथेही दैवाने साथ दिली नाही. एके दिवशी ती बाथरूममध्ये पाय घसरून पडली. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं, उभी राहण्याचा प्रयत्न करू नकोस, कायम बेडवर राहावं लागेल. हे ऐकल्यानंतर तर वंदनाच्या डोळ्यासमोर आपल्या भवितव्याबाबत अंधार दिसू लागला. तिच्या नशिबी कायम व्हीलचेअर आली. पण, तिने जिद्द सोडली नाही.
तिने कोल्हापूर येथील अपंगांचे प्रेरणास्थान असलेल्या नजमा हुरजूक यांच्या अपंग पुनर्वसन केंद्रात प्रशिक्षण पूर्ण केलं. काही वर्षे तिने शिकवण्याही घेतल्या. पण, तिचे दुर्दैव संपले नव्हते. आर्थिक दुर्बलतेमुळे मांजरेकर कुटुंबाला भाड्याची खोली सोडावी लागली. नवीन जागा गैरसोयीची. तिच्या शिकवण्या थांबल्या. अर्थार्जन थांबले. मनातील आशा कोमेजली. तिला वाचनाची आवड होती. एके दिवशी वृत्तपत्र वाचतानाच तिला स्वयंसेतू संस्थेच्या रूपात आशेचा किरण मिळाला. संस्थेच्या संस्थापिका श्रद्धा कळंबटे व संस्थेच्या कार्यकर्त्यांनी वंदना आणि तिच्या कुटुंबाला तीन वर्षे मानसिक आधार दिला. तिला येथील माहेर संस्थेत कायमचा सुरक्षित निवारा मिळवून दिला. चार महिन्यांपूर्वीच वंदना माहेर संस्थेत आली आणि आपल्या स्वभावाने सर्वांचीच लाडकी झाली. या मुलांची ताई बनून ती आता त्यांची नियमित शिकवणी घेतेय. ती स्वावलंबी झाल्याचा सार्थ विश्वास ‘माहेर’च्या सर्व परिवाराने तिच्यात निर्माण केलाय.