‘पंचतीर्थ’मध्ये आंबडवे गावाचा समावेश व्हावा; राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 11:52 IST2022-02-13T11:51:25+5:302022-02-13T11:52:16+5:30
राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांनी शनिवारी सकाळी आंबडवे गावाला भेट दिली. या भेटीमध्ये त्यांनी डाॅ. आंबेडकर यांच्या स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली.

‘पंचतीर्थ’मध्ये आंबडवे गावाचा समावेश व्हावा; राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांचे प्रतिपादन
मंडणगड (जि. रत्नागिरी) : केंद्र शासनातर्फे पंचतीर्थांच्या विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या पंचतीर्थ विकासामध्ये मंडणगड तालुक्यातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबडवेचाही समावेश व्हावा, असे राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांनी शनिवारी आंबडवे येथे सांगितले.
राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांनी शनिवारी सकाळी आंबडवे गावाला भेट दिली. या भेटीमध्ये त्यांनी डाॅ. आंबेडकर यांच्या स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यामंदिराच्या प्रांगणात कार्यक्रमाचे आयाेजन केले हाेते. आंबडवे हे गाव तीर्थयात्रेसमान आहे. केंद्र शासनातर्फे डॉ. आंबेडकर यांच्या स्मृती जपणाऱ्या पाच स्थळांचा विकास करण्यात येत आहे. त्यामध्ये महू गाव, दीक्षाभूमी नागपूर, दिल्लीतील महापरिनिर्वाण क्षेत्र, मुंबईतील चैत्यभूमी आणि लंडनमधील आंबेडकर भवन यांचा समावेश आहे. त्यांपैकी चारही स्थळांना मी भेट दिली आहे. या पंचतीर्थ स्थळांच्या विकास कार्यक्रमात आंबडवे गावाचाही समावेश करावा.
रत्नागिरीच्या हापूसचे काैतुक
रत्नागिरी हापूस आंब्याच्या गाेड चवीचे राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांनी काैतुक केले. हापूसचा गाेडवा येथील लाेकांच्या आचरणात, वाणीमध्येही आहे, तो आता आता देशभर पसरावा, अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखविली.