चिपळुणातील सर्व्हिस रोडचे काँक्रिटीकरण होणार, मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आदेश
By मनोज मुळ्ये | Updated: August 30, 2022 21:12 IST2022-08-30T21:11:27+5:302022-08-30T21:12:17+5:30
या बैठकीमध्ये मुंबई - गोवा महामार्गावरील चिपळूण शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलालगच्या सर्व्हिस रोडबाबत चर्चा झाली

चिपळुणातील सर्व्हिस रोडचे काँक्रिटीकरण होणार, मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आदेश
मनोज मुळ्ये
रत्नागिरी : चिपळूण शहरातील वाहतुकीचे प्रमाण पाहता महामार्गावरील उड्डाणपुलालगतचा सर्व्हिस रोड चांगला असणे गरजेचे आहे. त्यासाठी या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत. मंत्री चव्हाण यांनी मंगळवारी राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडील कामांच्या प्रगतीबाबत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे आढावा घेतला. या बैठकीला अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, सचिव (रस्ते) एस. एस. साळुंखे, सचिव (बांधकामे) पी. डी. नवघरे व राज्यातील सर्व मुख्य अभियंता उपस्थित होते.
या बैठकीमध्ये मुंबई - गोवा महामार्गावरील चिपळूण शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलालगच्या सर्व्हिस रोडबाबत चर्चा झाली. या रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांबाबत अधिक तक्रारी असल्याचे सांगण्यात आले. चिपळूण शहरात कुंभार्ली घाटाकडून येणारी वाहतूक, गुहागरकडून येणारी वाहतूक तसेच रत्नागिरी व मुंबईकडून येणारी वाहतूक मोठ्या प्रमाणावर असते. शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी व नोकरदार यांना शहरात दैनंदिन कामासाठी यावे लागते. त्यांची या खड्ड्यांच्या त्रासातून सुटका होणे आवश्यक असल्याचे मत मंत्री चव्हाण यांनी व्यक्त केले. त्यामुळे या समस्येवर कायमस्वरुपी उपाययोजना म्हणून चिपळूण शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलानजीकच्या सर्व्हिस रोडचे काँक्रीटीकरण करण्याचे आदेश त्यांनी दिले.