‘बाळासाहेबांचा वारसदार जनतेनेच ठरवला’; माजी आमदारांसह अनेक पदाधिकारी शिंदेसेनेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 06:23 IST2025-02-16T06:23:02+5:302025-02-16T06:23:02+5:30
उद्धवसेनेचे माजी आमदार, विद्यमान जिल्हाप्रमुख, जिल्हा परिषदेचे तीन माजी अध्यक्ष यांच्यासह अनेकांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यांचे एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले.

‘बाळासाहेबांचा वारसदार जनतेनेच ठरवला’; माजी आमदारांसह अनेक पदाधिकारी शिंदेसेनेत
रत्नागिरी : राज्यात शिंदेसेनेने ८० उमेदवार दिले आणि त्यातील ६० निवडून आले. उद्धवसेनेने ९७ उमेदवार दिले, त्यातील फक्त २० निवडून आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार कोण आहेत, हे जनतेनेच दाखवून दिले आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. उद्धवसेनेचे माजी आमदार, विद्यमान जिल्हाप्रमुख, जिल्हा परिषदेचे तीन माजी अध्यक्ष यांच्यासह अनेकांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यांचे एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले.
विधानसभेत विजयी झाल्यानंतर आपण आभार मानण्यासाठी येण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार आपण आलो आहोत, असे सांगून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या वाढीमध्ये कोकणी माणसाचाच हात मोठा असल्याचे सांगितले. म्हणूनच रत्नागिरी, सिंधुदुर्गातील ८ पैकी ७ जागा महायुतीला मिळाल्या आहेत, असे ते म्हणाले.
युतीचे राज्य असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या अनेक योजना महाविकास आघाडी सरकारने बंद केल्या. असा टोलाही त्यांनी हाणला.
लाडका भाऊ मोठा सन्मान
राजकारणात पदे वरखाली होत राहतात; पण मुख्यमंत्री म्हणून मी राबविलेल्या लाडकी बहीण योजनेला राज्यात सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्यातून मिळालेला ‘लाडका भाऊ’ हा सन्मान आपल्यासाठी सर्व पदांपेक्षा मोठा आहे, असेही एकनाथ शिंदे आवर्जून म्हणाले.
दाढीच्या मागे लागू नका, मला हलक्यात घेऊ नका
दाढी म्हणून आमची चेष्टा केली जाते, पण दाढीनेच आघाडीत बिघाड केला आणि महायुतीची विकासाची गाडी पुढे नेली. मात्र, या दाढीच्या नादाला लागू नका. मी आरोपांना कामातून उत्तर देणारा माणूस आहे, मला हलक्यात घेऊ नका, असे एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून उद्धव ठाकरे यांना सुनावले.