चिपळूणात पहिल्याच पावसात महामार्ग बनला चिखलमय, दुचाकी घसरून किरकोळ अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 01:23 PM2023-06-24T13:23:51+5:302023-06-24T13:25:00+5:30

अपघातात एक वयोवृद्ध महिला जखमी

the highway became muddy in the first rain In Chiplun, a minor accident occurred due to a two wheeler slip | चिपळूणात पहिल्याच पावसात महामार्ग बनला चिखलमय, दुचाकी घसरून किरकोळ अपघात

चिपळूणात पहिल्याच पावसात महामार्ग बनला चिखलमय, दुचाकी घसरून किरकोळ अपघात

googlenewsNext

चिपळूण : दीर्घ प्रतीक्षेनंतर शुक्रवारी (२३ जून) सकाळी चिपळूण तालुक्यात पावसाच्या सरी कोसळल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. मात्र, काही वेळानंतर पावसाने उघडीप घेत कडक ऊन पडल्याने सर्वांचीच निराशा झाली. मात्र, या पावसामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिखल साचल्याने प्रांत कार्यालय व चिपळूण पंचायत समितीसमोर दुचाकी घसरून अपघात झाल्याच्या काही घटना घडल्या. यामध्ये एका ७० वर्षीय महिलेच्या पायाला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे.

जून महिना संपत आला तरी अद्याप पावसाचे आगमन झालेले नाही. हवामान खात्याने २३ जूनपासून मान्सून सक्रिय होईल, असा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपळूण व रत्नागिरी भागात शुक्रवारी सकाळी पावसाचे वातावरण तयार झाले होते. काही वेळानंतर या भागात पावसाच्या हलक्या तर काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला. चिपळूण तालुक्यातही पावसाने काही क्षण हजेरी लावली. मात्र, त्यानंतर सायंकाळपर्यंत पावसाचा थेंबही पडला नाही. पावसाच्या हुलकावणीमुळे शेतकरीराजा पुन्हा निराश झाला.

मात्र, थोडा वेळ पडलेल्या पावसामुळे येथील महामार्गावर काही ठिकाणी मातीच्या भरावामुळे रस्ता चिखलमय झाला हाेता. येथील प्रांताधिकारी कार्यालय व पंचायत समितीसमोर अक्षरशः चिखलाचे साम्राज्य पसरले होते. हा चिखल दोन सर्व्हिस रोडच्या मधोमध होता. त्यामुळे रस्त्याच्या पलीकडे ये-जा करताना चिखल महामार्गावर आला. या चिखलात काही दुचाकी घसरून पडल्या. यामध्ये काहींना दुखापतही झाली. या अपघातात एक वयोवृद्ध महिलाही गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. पावसाळा सुरू झाल्यावर येथे पुन्हा तीच परिस्थिती उद्भवणार आहे. त्यामुळे त्यावर खडी टाकून तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी केली जात आहे.

Web Title: the highway became muddy in the first rain In Chiplun, a minor accident occurred due to a two wheeler slip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.