महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी १२ फेब्रुवारीपासून रत्नागिरीत
By मेहरून नाकाडे | Updated: February 8, 2025 17:56 IST2025-02-08T17:55:57+5:302025-02-08T17:56:22+5:30
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित २१ वी महाराष्ट्र राज्य बाल नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी येथील स्वातंत्र्यवीर ...

महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी १२ फेब्रुवारीपासून रत्नागिरीत
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित २१ वी महाराष्ट्र राज्य बाल नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहात दि. १२ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत रंगणार आहे. प्राथमिक फेरीतून पात्र ठरलेले राज्यातील एकूण ३२ संघ या अंतिम फेरीत बालनाट्याचे सादरीकरण करणार आहेत.
रत्नागिरीमध्ये आत्तापर्यंत गद्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी आणि संगीत नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी झाली होती. मात्र बालनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी पहिल्यांदाच रत्नागिरीत होत आहे. बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीनिमित्ताने ५०० पेक्षाहून अधिक बालकलाकार सादरीकरणासाठी रत्नागिरीत येणार आहे.
स्पर्धेसाठी मुंबई, पुणे, ठाणे, संभाजीनगर, अहिल्यानगर, जळगाव, परभणी, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, कल्याण, यवतमाळ, अकोला, नंदुरबार, भुसावळ, नाशिक, सांगली, नांदेड, अमरावती तसेच इंदौर येथून संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ दि. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात होणार आहे. दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत बालनाट्यांचे सादरीकरण होणार आहे.