अकरावी प्रवेशासाठी कसोटी!

By Admin | Updated: June 19, 2014 01:12 IST2014-06-19T01:06:31+5:302014-06-19T01:12:09+5:30

डोकेदुखी वाढली : दहा हजार विद्यार्थी ठरणार अतिरिक्त ?

Test for the eleventh entrance! | अकरावी प्रवेशासाठी कसोटी!

अकरावी प्रवेशासाठी कसोटी!

रत्नागिरी : दहावीच्या निकालाने संपवलेली विद्यार्थ्यांच्या हृदयाची धडधड आता अकरावीसाठी प्रवेश मिळवताना पुन्हा वाढणार आहे. दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील २६ हजार ५२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मात्र अकरावीसाठी जिल्ह्यामध्ये प्रवेश क्षमता १६ हजार ३२० इतकी आहे. त्यामुळे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची कसोटी लागणार आहे. विद्यार्थी क्षमता पाहता दहा हजार विद्यार्थी अतिरिक्त ठरणार आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातून दहावीच्या परीक्षेसाठी २७ हजार ८७७ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २६ हजार ५२३ विद्यार्थी पास झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात ३८६ माध्यमिक शाळा आहेत. स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालये ४, वरिष्ठ महाविद्यालयाशी संलग्न ६ तर माध्यमिक शाळांशी संलग्न १०९ मिळून जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयाची संख्या १०९ इतकी आहे. कनिष्ठ महाविद्यालयातील कला, वाणिज्य, विज्ञान व संयुक्त मिळून एकूण २८४ तुकड्यांमध्ये १६ हजार ३२० विद्यार्थी क्षमता आहे.
कला विभागाच्या एकूण ८० तुकड्या असून ४ हजार १८० विद्यार्थी संख्या आहे. वाणिज्य विभागाच्या ८५ ५ हजार ८० विद्यार्थी संख्या आहे. विज्ञान विभागाच्या ७८ तुकड्या असून, ४ हजार ५८० विद्यार्थी संख्या आहे. विज्ञान विभागाकडे विद्यार्थ्यांचा ओढा अधिक असल्यामुळे प्रवेशासाठी सर्वाधिक कसोटी लागते. संयुक्त विभागाच्या ४१ तुकड्या असून २ हजार ४८० विद्यार्थी संख्या आहे. एका तुकडीत ८० ते १०० विद्यार्थी संख्या सामावून घेण्यात येते. त्यामुळे कला विभागामध्ये ६ हजार ५८०, वाणिज्य विभागात ७ हजार ८०, विज्ञान विभागात ६ हजार ४४०, संयुक्त विभागात ३ हजार ३०० विद्यार्थ्यांना प्रवेश देता येऊ शकतो. तरीही ३१२३ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न उद्भवू शकतो.
काही विद्यार्थी पॉलिटेक्नीकल किंवा काही आयटीआयमध्ये प्रवेश घेत असल्यामुळे सुमारे हजार विद्यार्थी पॉलिटेक्नीकल किंवा आयटीआयमध्ये सामावू शकतात. उर्वरित दोन हजार विद्यार्थ्यापुढे मात्र मोठा प्रश्न आहे. काही विद्यार्थी मुंबई, पुण्याकडे प्रवेशासाठी जात असले तरी ग्रामीण भागातील अन्य विद्यार्थ्यासमोर मात्र प्रवेशाचा प्रश्न उदभवणार आहे.
गुणवत्तानिहाय प्रवेश देण्यात येत असल्यामुळे तसेच वरिष्ठ महाविद्यालयाशी संलग्न कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी पालकांचा ओढा सर्वाधिक असल्याने तेथील प्रवेश प्रक्रिया बिकट बनते किंबहुना लांबत आहे. बहुतांश विद्यार्थ्यांना विशिष्ट महाविद्यालयात प्रवेश हवा असल्याने कुठे अतिरिक्त गर्दी तर कुठे जागा रिक्त असे चित्रही गेल्या काही वर्षात रत्नागिरी, चिपळूणमध्ये दिसले आहे.
दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आणि समाधानकारक गुण मिळाल्यानंतर आनंदाने हरखून गेलेल्या विद्यार्थ्यांना आता अकरावी आणि त्यातही विज्ञान शाखेत प्रवेश मिळवायचा असेल तर झगडावे लागणार आहे. निकालानंतर लगेचच अकरावीची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असून विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा अधिक कल असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Test for the eleventh entrance!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.