राजापुरात विनाकारण फिरणाऱ्या १५० जणांची चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:23 IST2021-05-28T04:23:48+5:302021-05-28T04:23:48+5:30
राजापूर : सातत्याने सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करीत शहरात फिरणाऱ्या व बाजारपेठेत नाहक गर्दी करणाऱ्या सुमारे १४५ नागरिकांची आरटीपीसीआर ...

राजापुरात विनाकारण फिरणाऱ्या १५० जणांची चाचणी
राजापूर : सातत्याने सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करीत शहरात फिरणाऱ्या व बाजारपेठेत नाहक गर्दी करणाऱ्या सुमारे १४५ नागरिकांची आरटीपीसीआर तर ५ जणांची शहरातील जवाहर चाैक येथे ॲंटिजन चाचणी करण्यात आली़ या चाचणीतील ॲंटिजन चाचणीचे सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती प्रशासनाने दिली़
राजापूर महसूल विभाग, राजापूर पोलीस, नगरपरिषद आणि ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली़ तहसीलदार प्रतिभा वराळे,उपविभागीय पोलीस अधिकारी साळोखे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी देवानंद ढेकळे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राम मेस्त्री, पाेलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांची यावेळी उपस्थिती हाेती़
कोविडच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सातत्याने सूचना देऊनही राजापूरकर यांच्याकडून दुर्लक्ष करण्यात येत हाेते. दररोज राजापूरच्या बाजारपेठेत नाहक गर्दी केली जात होती. अकारण फिरणाऱ्यांची संख्याही वाढत हाेती. सूचना देऊनही निर्धास्त झालेल्या राजापूरकर यांना वचक बसावा यासाठी गुरूवारी आठवडा बाजार दिवशी जवाहर चाैक येथे पथक तैनात करण्यात आले़ पाेलिसांची कुमक ही यावेळी उभी हाेती़ कोविडचा संसर्ग राेखण्यासाठी नियमबाह्य फिरणाऱ्या नागरिकांची कोविड चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला़ शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांसह अन्य प्रकारच्या वाहनांचे चालक यांना जवाहर चौकात अडवून काेराेना चाचणी करण्यात आली़ यावेळी १४५ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली़ त्याचा अहवाल दाेन दिवसात प्राप्त हाेणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली़
दरम्यान, शहरात नाहक फिरणाऱ्या नागरिकांना चाप बसावा म्हणून प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे नाहक फिरणाऱ्या नागरिकांचे धाबे दणाणले या कारवाईनंतर राजापूर शहरात शुकशुकाट पसरला हाेता़ नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे बंद केले नाही तर त्यांची चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे़
-------------------------
विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची गुरूवारी राजापूर शहरातील जवाहर चाैक येथे काेराेना चाचणी करण्यात आली़