अल्ट्राटेक सिमेंटचे रत्नागिरी येथील कार्यालय सील करण्याचे तहसीलदारांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2021 18:35 IST2021-11-30T18:16:13+5:302021-11-30T18:35:17+5:30
अल्ट्राटेक सिमेंट या कंपनीला मिऱ्या येथील जमीन महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांनी भाडेपट्ट्यानी दिली आहे. या जमिनीचा कंपनी औद्योगिक वापर करत असल्याने आणि वापरास कोणतीही पूर्व परवानगी घेतली नसल्याने रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव यांनी याबाबत कंपनीस नोटीस देऊन खुलासा मागवला होता.

अल्ट्राटेक सिमेंटचे रत्नागिरी येथील कार्यालय सील करण्याचे तहसीलदारांचे आदेश
रत्नागिरी : भाडेपट्ट्यावर दिलेल्या जमिनीवर पूर्व परवानगी न घेता औद्योगिक वापर केल्याचा ठपका रत्नागिरीतील अल्ट्राटेक कंपनीवर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी ठोठावलेला दंड दोन दिवसात न भरल्यास अल्ट्राटेक सिमेंटचे रत्नागिरी येथील कार्यालय सील करण्याचे आदेश तहसीलदार शशिकांत जाधव यांनी दिले आहेत.
तालुक्यातील अल्ट्राटेक सिमेंट या कंपनीला मिऱ्या येथील जमीन महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांनी भाडेपट्ट्यानी दिली आहे. या जमिनीचा कंपनी औद्योगिक वापर करत असल्याने आणि वापरास कोणतीही पूर्व परवानगी घेतली नसल्याने रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव यांनी याबाबत कंपनीस नोटीस देऊन खुलासा मागवला होता. हा खुलासा समाधानकारक नसल्याने सन १९८१ पासून अनधिकृत बिनशेती वापर करीत असल्याने कंपनीस रक्कम ८ लाख ५५ हजार ६८५ रुपये इतका दंडाचा आदेश करण्यात आला आहे.
हा दंड भरणेबाबत कंपनीस दोन नोटीस देण्यात आलेल्या होत्या. तथापि आज अखेर कंपनीने दंडाची रक्कम भरलेली नाही. कंपनीने दोन दिवसात दंडाची रक्कम न भरल्यास २ डिसेंबर रोजी झाडगाव येथील कंपनीच्या कार्यालयातील मनुष्यबळ विभाग (HR SECTION) सील करण्याचे लेखी आदेश तहसीलदार यांनी दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या निवासी नायब तहसीलदार व मंडल अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. तसेच या कार्यवाहीत कोणताही अडथळा आणल्यास संबंधितांवर शासकीय कामात अडथळा आणल्याबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश तहसीलदार शशिकांत जाधव यांनी दिले आहेत.