शिक्षकांचे पगार जाणार लांबणीवर!
By Admin | Updated: April 8, 2015 23:54 IST2015-04-08T21:36:08+5:302015-04-08T23:54:53+5:30
माध्यमिक विभाग : वारंवारच्या घटनेने नाराजी

शिक्षकांचे पगार जाणार लांबणीवर!
टेंभ्ये : माध्यमिक शिक्षकांचे मार्च महिन्याचे एप्रिलमध्ये जमा होणारे पगार लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासनाकडून अद्याप पगार अनुदान प्राप्त न झाल्याने पगार उशिरा जमा होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे.
मार्च महिन्याचे पगार लांबणीवर पडणे हे कायमचेच झाले असल्याने शिक्षक वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. ‘शालार्थ’ ही आॅनलाईन वेतन प्रणाली सुरु झाल्यापासून अपवाद वगळता एक तारखेला पगार जमा झाल्याचे पाहायला मिळत नाही. प्रत्येक वेळी पगारास होणाऱ्या विलंबास नेमके कारण काय? असा प्रश्न संघटना स्तरावरून उपस्थित केला जात आहे.
आर्थिक वर्षअखेर म्हणून मार्च महिन्याकडे पाहिले जाते. मार्च महिन्याचा पगार उशीरा होत असल्याने माध्यमिक शिक्षकांना एप्रिल महिन्यात आर्थिक घडी बसविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. यावर्षी अद्याप वेतन अनुदानच जमा झाले नसल्याने पगार लांबणीवर पडणार हे निश्चित झाले आहे.
आगामी चार दिवसात अनुदान जमा झाल्यास २० मेपर्यंत शिक्षकांना पगार मिळू शकतो. अनुदान प्राप्त होण्यास उशीर झाल्यास पगार अधिक लांबणीवर जाऊ शकतो, असे मत वेतन पथक विभागातून व्यक्त केले जात आहे. त्यामुळे मार्च महिना उशिराने होणारे पगार यामुळेच माध्यमिक शिक्षकांच्या कायम लक्षात राहतो.
माध्यमिक वेतन पथक विभागाला सध्या पूर्णवेळ अधीक्षक नसल्याने ‘शालार्थ’ ही आॅनलाईन प्रणाली कार्यान्वित होऊनदेखील जिल्ह्यात माध्यमिक शिक्षकांचे पगार वेळेवर होत नाहीत. जवळपास मार्च २०१२ पासून माध्यमिक वेतन पथक विभागास पूर्णवेळ अधीक्षक नाही. प्रत्येकवेळी या पदाचा अतिरिक्त कार्यभार समक्ष अधिकाऱ्याकडे दिला जातो. यामुळे या विभागाचे काम प्रत्येक वर्षाला प्रलंबित राहते. माध्यमिक शिक्षकांच्या पगाराकडे शासन व प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसत आहे.
एक तारखेला पगार हा नियम रत्नागिरी जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांच्या बाबतीत कधी सत्यात उतरणार आहे? असा प्रश्न विचारला जात असल्याचे माध्यमिक अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष भारत घुले यांनी स्पष्ट केले. परंतु याबाबत शिक्षण विभागाकडून कोणतेही ठोस उत्तर मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)
आॅनलाईनमुळे उर्वरित खात्यांचे पगार वेळेत आणि जलदगतीने होत असताना दुसरीकडे शिक्षण खात्याचे पगार मात्र याच प्रणालीमुळे उशिराने होताना दिसत आहे.