शिक्षकांना बदली जागी हजर होण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 13:39 IST2019-05-04T13:37:50+5:302019-05-04T13:39:07+5:30
रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. बदली झालेल्या ३३४८ शिक्षकांपैकी ३३४० शिक्षक २ मे रोजी मूळ शाळेतून कार्यमुक्त झाले. उर्वरित ८ शिक्षकांपैकी काही स्वेच्छा निवृत्त, काही मृत, तर काही दीर्घ मुदतीच्या रजेवर असल्याने कार्यमुक्त होऊ शकलेले नाहीत. कार्यमुक्त झालेल्या शिक्षकांनी बदलीच्या जागी हजर होण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी दिले आहेत.

शिक्षकांना बदली जागी हजर होण्याचे आदेश
रत्नागिरी : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. बदली झालेल्या ३३४८ शिक्षकांपैकी ३३४० शिक्षक २ मे रोजी मूळ शाळेतून कार्यमुक्त झाले. उर्वरित ८ शिक्षकांपैकी काही स्वेच्छा निवृत्त, काही मृत, तर काही दीर्घ मुदतीच्या रजेवर असल्याने कार्यमुक्त होऊ शकलेले नाहीत. कार्यमुक्त झालेल्या शिक्षकांनी बदलीच्या जागी हजर होण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी दिले आहेत.
सन २०१२ नंतर तब्बल ६ ते ७ वर्षांनी यंदा शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या करण्यात आल्या. बदली प्रक्रियेलामध्ये सुगम - दुर्गम याद्यांबाबत शिक्षण संघटनांनी विभागीय आयुक्तांकडे अपील केले होते. हे अपील फेटाळून निकाली काढल्यामुळे पूर्वीच्या सुगम - दुर्गम अंतिम याद्यांनुसार बदली प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, बदलीचे आदेश ५ मार्च २०१९ रोजीच काढण्यात आले होते.
वर्षाच्या शेवटच्या दिवशी शाळेत हजर व्हावे, असे बदली आदेशामध्ये नमूद होते. मात्र, १ मे महाराष्ट्र दिनी झेंडा फडकवणे व उतरवण्यासाठी २९ एप्रिल २०१९च्या पत्रानुसार शिक्षकांनी २ मे रोजी कार्यमुक्त होऊन ३ मे रोजी बदलीच्या शाळेत हजर होण्याबाबत शिक्षण विभागाकडून शिक्षकांना कळविण्यात आले होते.
दरम्यान, कोकण विभागीय आयुक्तांकडून २ मे रोजी सायंकाळी ६ वाजल्यानंतर शिक्षण विभागाला एक आदेश मिळाला. त्यामध्ये ज्या शिक्षकांनी बदली प्रक्रियेबाबत अपील केले आहे, त्यांच्या अपिलाबाबत निर्णय होईपर्यंत बदली आदेशाला स्थगिती द्यावी, असे म्हटले होते. मात्र, हा आदेश मिळण्याआधीच शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले होते. त्यामुळे अपिलांवरील निर्णयाअंती पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
अहवाल सादर करा
मात्र, १९७ शिक्षकांच्या बदल्यांना स्थगिती मिळाल्याच्या बातम्या आल्यानंतर शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत सर्व शिक्षकांना बदली झालेल्या शाळांमध्ये हजर करून घ्यावे व हजर अहवाल सादर करावेत, असे निर्देश जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभाग शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.