राजकीय पादत्राणे दूर सारून एकदिलाने काम करा : संताेष गाेवळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:41 IST2021-06-16T04:41:53+5:302021-06-16T04:41:53+5:30
मंडणगड : जनतेच्या जीविताशी संबंधित विषयावरही श्रेय लाटण्याचा प्रयत्न झाला तर विरोधकांनीही राजकारण सुरु केले. जनतेला सुविधा उपलब्ध करुन ...

राजकीय पादत्राणे दूर सारून एकदिलाने काम करा : संताेष गाेवळे
मंडणगड : जनतेच्या जीविताशी संबंधित विषयावरही श्रेय लाटण्याचा प्रयत्न झाला तर विरोधकांनीही राजकारण सुरु केले. जनतेला सुविधा उपलब्ध करुन देण्यात जिल्हा परिषदेच्या धोरणात्मक निर्णयाची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. याचे श्रेय चुकीच्या पध्दतीने लाटण्याचा प्रयत्न कोणी केल्यास तो चुकीचा आहे. कोरोना काळात येथील जनतेला जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वांनी राजकीय पादत्राणे दूर सारुन एकदिलाने काम करण्याची आवश्यकता असल्याचे मत जिल्हा परिषद सदस्य संताेष गाेवळे यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील राजकीय वादाचे कारण ठरलेल्या देव्हारे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण जिल्हा परिषद सदस्य संतोष गोवळे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बाेलत हाेते. देव्हारेे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात एकूण ४९ गावे व अनेक वाड्यांचा समावेश आहे तसेच या गावांचे आरोग्य केंद्रापासूनचे अंतर तीन ते वीस किलोमीटर इतके आहे. सद्यस्थितीत आरोग्य केंद्रात उपलब्ध असलेली रुग्णवाहिका ही वारंवार नादुरस्त व आपत्कालिन प्रसंगात मध्येच बंद पडण्याचे प्रकार घडल्याने रुग्णांच्या जीवावर बेतले आहे. त्यामुळे परिसरातील जनतेची ही महत्त्वाची निकड व गरज लक्षात घेऊन देव्हारे आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मंडणगड तालुक्यातील कुंबळे येथील आरोग्य केंद्रालाही नवीन रुग्णवाहिका लवकर उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच निकषात बसल्यास पणदेरी आरोग्य केंद्रालासुद्धा नवीन रुग्णवाहिका देण्याचा प्रयत्न राहील, असे संताेष गाेवळे म्हणाले. यावेळी देव्हारे प्राथमिक आरोग्य केंद्रांचे डॉ. सानप, भाई पोस्टुरे, रघुनाथ पोस्टुरे, इरफान बुरोंडकर, अभय पिचुर्ले, देव्हारे सरपंच अमृत बर्जे, उपसरपंच हरेश म्हाब्दी, सिमरन चोरगे, सूर्यकांत चोरगे तसेच ग्रामपंचायत व रुग्णकल्याण समितीचे सदस्य उपस्थित होते.
--------------------
रुग्णवाहिकेमुळे वाचले रुग्णाचे प्राण
देव्हारे आरोग्य केंद्राला नव्याने मिळालेल्या रुग्णवाहिकेमुळे गावातील एका व्यक्तीचे प्राण वाचविण्यात यश आल्याची घटना ७ जून २०२१ रोजी घडली. या व्यक्तीला सर्पदंश झाल्याने त्याची प्रकृती अस्वस्थ झाली होती. देव्हारे येथे सुस्थितील रुग्णवाहिका उपलब्ध असल्याने या रुग्णवाहिकेतून त्याला त्वरित दापोली येथे पुढील उपचाराकरिता हलविण्यात आले. प्रवासादरम्यान त्याची प्रकृती अत्यवस्थ असतानाही रुग्णवाहिकेमुळे वेळेत पोहाेचल्याने उपचार मिळून रुग्णाचे प्राण वाचले.