गुंतवलेल्या रकमेसाठी तगादा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:30 IST2021-03-20T04:30:07+5:302021-03-20T04:30:07+5:30
रत्नागिरी : शासनाची विविध कामे करताना गेल्या वर्षभरात अनेकांना कामे मिळाली नाहीत. कोरोनामुळे मंदी निर्माण झाली आहे. त्यातच शासनाकडून ...

गुंतवलेल्या रकमेसाठी तगादा
रत्नागिरी : शासनाची विविध कामे करताना गेल्या वर्षभरात अनेकांना कामे मिळाली नाहीत. कोरोनामुळे मंदी निर्माण झाली आहे. त्यातच शासनाकडून नवीन कामांना होणारा विलंब पाहता गुंतविलेले पैसे परत मिळावेत म्हणून विविध विभागांत ठेकेदारांनी तगादा लावण्यास सुरुवात केली आहे.
अखेर पोल बदलला
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील कसबा दखनी मोहल्ला तालाब मशिदीसमोरील विद्युतखांब धोकादायक झाला होता. नवीन खांब बदलण्याची मागणी ग्रामस्थांकडून महावितरणकडे करण्यात येत होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. अखेर, ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने हा धोकादायक पोल बदलण्यात आला आहे.
वीजपुरवठा खंडित
रत्नागिरी : शहरात सध्या सातत्याने वीजपुरवठा खंडित होऊ लागला आहे. सध्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे घरी अथवा कामाच्या ठिकाणी सतत पंखे सुरू ठेवावे लागत आहेत. आधीच उष्म्याने हैराण केले असतानाच वीजपुरवठा सतत खंडित होऊ लागल्याने उकाड्याने नागरिक त्रस्त होत आहेत.
मासिक संगीत सभा
देवरूख : शहरातील ललित कला अकादमीची मार्च महिन्याची मासिक संगीत सभा तबलावादनाने रंगली. या संगीत सभेत अकादमीचे विद्यार्थी संचित मुळे आणि ओंकार ब्रिद यांनी सोलो तबलावादन केले. या कार्यक्रमाचा लाभ शहरातील अनेक रसिकांनी घेतला.
आंब्याची गळ वाढली
जाकादेवी : यंदा पाऊस नोव्हेंबरपर्यंत लांबल्याने आंबा कलमांना दुबार मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे कैरीवरही परिणाम होत आहे. याचबरोबर सध्या तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे आंब्याची गळही वाढू लागली आहे.
निर्बंध घालण्याची मागणी
चिपळूण : शहरातील साने गुरुजी उद्यानाचे उद्घाटन नुकतेच झाले आहे. त्यामुळे सायंकाळच्या वेळी नागरिक आणि बालके मोठ्या प्रमाणावर या उद्यानात गर्दी करत आहेत. परंतु, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन या उद्यानातील प्रवेशावर निर्बंध घालण्याची मागणी करण्यात येत आहे.
स्वच्छतागृह भूमिपूजन
राजापूर : तालुक्यातील कशेळी आवळीचीवाडी येथे कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत स्वच्छतागृह बांधणे व रेलिंग बसविणे, या कामाचे जागामालक योगेश यादव यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. हा उपक्रम खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली झाला.
केळवली संघ विजेता
राजापूर : तालुक्यातील गोठणे दोनिवडे येथील भीमशक्ती क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत बीसीसी केळवली संघाने विजेतेपद पटकावले. तर, एनसीसी राघववाडी संघाला उपविजेतेपद मिळाले. मान्यवरांच्या हस्ते या दोन्ही संघांना गौरविण्यात आले.
निधी खर्चाची धावपळ
दापोली : ३१ मार्च जवळ आल्याने विविध शासकीय कार्यालयांकडे आलेला निधी विविध कामांसाठी खर्च करण्यासाठी या कार्यालयांची धावपळ सुरू आहे. ३१ मार्चपूर्वी हा निधी खर्च न झाल्यास निधी शासनाकडे परत जाण्याचा धोका असल्याने कार्यालये धावपळ करीत आहेत.
पगार रखडणार?
रत्नागिरी : मार्च महिन्यात सर्व आर्थिक व्यवहार पूर्ण करण्याची घाई असते. त्यामुळे अनेक पगारबिले रखडली जातात. त्यामुळे काही शासकीय कर्मचा-यांचे पगार मार्च, एप्रिल या दोन महिन्यांत होत नाहीत. त्यामुळे आता मार्च एंडिंगला आपले पगार होणार की नाही, ही चिंता कर्मचाऱ्यांना लागून राहिली आहे.