देवरूखमधील स्वीटमार्टच्या खाद्यपदार्थात किडी, स्वीट मार्टवर हल्लाबोल, मालकाला प्रसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 17:20 IST2018-07-14T17:17:04+5:302018-07-14T17:20:02+5:30
देवरूख शहरातील द्वारका स्वीट मार्टमधील खाद्यपदार्थांमध्ये किडी असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. देवरूखातील नागरिकांनी या स्वीट मार्टवर हल्लाबोल करत मालकाला चांगलाच प्रसाद दिला.

देवरूखमधील स्वीटमार्टच्या खाद्यपदार्थात किडी, स्वीट मार्टवर हल्लाबोल, मालकाला प्रसाद
देवरूख : शहरातील द्वारका स्वीट मार्टमधील खाद्यपदार्थांमध्ये किडी असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. देवरूखातील नागरिकांनी या स्वीट मार्टवर हल्लाबोल करत मालकाला चांगलाच प्रसाद दिला.
देवरूख नगरपंचायतीने याची गांभीर्याने दखल घेत पाहणी केली. त्यानंतर खाद्यपदार्थ बनविणे व विक्री करण्याचा परवाना रद्द करण्यात आल्याची माहिती नगरपंचायत प्रशासनाकडून उपलब्ध झाली आहे.
या दुकानात एक ग्राहक समोसा खात असताना या समोशामध्ये झुरळसदृश कीटक सापडला. ही बाब देवरूखमधील एका माजी नगरसेवकासह अन्य जागरूक नागरिकांना समजताच त्यांनी या दुकानावर धडक मारली. दुकान मालकावर प्रश्नांची सरबत्ती करत या नागरिकांनी एकच हल्लाबोल चढवला. त्याचप्रमाणे दुकानात व भटारखान्यात अस्वच्छता दिसल्याने नागरिक संतप्त झाले.
द्वारका स्वीट या दुकानाची पाहणी नगराध्यक्ष मृणाल शेट्ये, उपनगराध्यक्ष सुशांत मुळ्ये, मुख्याधिकारी बालाजी लोंढे, आरोग्य सभापती प्रेरणा पुसाळकर, नगरसेविका रेश्मा किर्वे, स्वीकृत नगरसेवक कुंदन कुलकर्णी यांसह सत्ताधारी नगरसेवक यांनी केली. त्याचबरोबर शहरातील जय अंबे स्वीट मार्टवरही याचप्रमाणे कारवाई करून पदार्थ बनवणे व विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली असल्याचे नगरपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात आले.