चिपळूण : तालुक्यातील गाणे खडपाेलीतील राजवाडा येथील आदिवासी कातकरी समाजातील दोन अल्पवयीन मुलींचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. २१) घडली. या दोन्ही बहिणी शेळ्यांना चरण्यासाठी घरामागील जंगलात गेल्या होत्या. दुपारनंतर घरी आल्यानंतर त्या मृतावस्थेत आढळल्या. या दोघींच्या मृतदेहाची कामथे उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल आल्यानंतरच या मुलींचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला, याचा उलगडा होणार आहे.मंगल मनोहर वाघे (१५) आणि सुप्रिया यशवंत वाघे (१४) असे दाेन मुलींची नावे आहेत. या दोघीही गुरुवारी सकाळी १०:३० वाजता घरामागील जंगलात शेळ्या चरण्यासाठी गेल्या होत्या. सायंकाळी ५ वाजता त्या घरी परतल्या व शेळ्यांना गोठ्यात बांधून ठेवले. यावेळी आई-वडील कामावर गेल्याने घरी कोणी नव्हते. काही वेळाने त्यांच्या मोठ्या बहिणीने घरात पाहिले असता त्या दोघी कुठेही दिसल्या नाहीत.शोधाशोध केल्यावर त्या गोठ्याजवळ तळमळत आणि घशाला घरघर लागल्याचे बहिणीने पाहिले. बहिणीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून ग्रामस्थांनी धाव घेत दाेघींना घरात आणले. मात्र, तोपर्यंत दोघींचा मृत्यू झाला होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली मात्र त्याचा उपयोग झाला नाही.या घटनेची माहिती मिळताच शिरगाव पोलिस स्थानकाचे सहायक पोलिस निरीक्षक भरत पाटील घटनास्थळी दाखल हाेऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. याप्रकरणी भरत पाटील अधिक तपास करीत आहेत.
दसपटीतील दुसरी घटनाकाही महिन्यांपूर्वीच कादवड येथील दोन आदिवासी तरुणी कपडे धुण्यासाठी नदीवर गेल्या असता त्यांचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाला होता. अखेर वैद्यकीय अहवालात बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर आता गाणे खडपाेली येथील दोन मुलींचा संशयास्पद मृत्यू झाला.
वैद्यकीय अहवालाकडे लक्षदाेघींचा विषबाधेतून मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. परंतु, वैद्यकीय अहवालानंतरच यामागची वस्तुस्थिती उघड होणार आहे. पोलिस यंत्रणेकडून चौफेर चौकशी केली जात आहे.