नवजात बाळावर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात यशस्वी लेझर शस्त्रक्रिया
By शोभना कांबळे | Updated: December 26, 2023 18:38 IST2023-12-26T18:37:51+5:302023-12-26T18:38:20+5:30
केवळ ११८० ग्रॅम इतके कमी वजनाचे हे बालक

नवजात बाळावर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात यशस्वी लेझर शस्त्रक्रिया
रत्नागिरी : दापोली येथील खाणीत काम करणाऱ्या उत्तर प्रदेश येथील खाण कामगाराच्या ११८० ग्रॅम इतक्या कमी वजनाच्या नवजात बालकावर येथील जिल्हा रूग्णालयात डाॅ. निकुंज भट यांनी यशस्वी लेझर शस्त्रक्रिया केली. त्यामुळे या बालकाचे भविष्यातील अंधत्व टळले आहे.
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या विशेष नवजात शिशु देखभाल कक्षात हे बालक उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. केवळ ११८० ग्रॅम इतके कमी वजनाचे हे बालक होते. बालकाच्या डोळ्याच्या तपासणी दरम्यान या बालकामध्ये राॅप (Retinopathy Of Prematurity) या आजाराचे निदान झाले. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तत्परतेने या बालकावर उपचार सुरु करण्यात आले.
ROP या आजारामध्ये उपचार देण्यास उशीर केल्यास बाळ कायमचे आंधळे होऊ शकते, ही शक्यता लक्षात घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्या मार्गदर्शनाखाली बाल नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. निकुंज भट यांच्यामार्फत दोन्ही डोळ्यांमध्ये मोफत इंजेक्शन देण्यात आले.
पुन्हा तपासणीच्या वेळी या बाळाच्या डोळ्याला लेझर शस्त्रक्रियेची गरज असल्याचे समजले. त्वरितच या बालकाच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि जिल्हा शासकीय रुग्णालयात १९ डिसेंबर रोजी डॉ. निकुंज भट यांच्यामार्फत लेझर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. हे बालक ६९ व्या दिवशी पूर्णपणे बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले या बालकाकरीता केल्या गेलेल्या सर्व चाचण्या, तपासण्या व औषधोपचार हे जिल्हा रूग्णालयामार्फत मोफत करण्यात आले.