वाचनाने आपण घडतो, अन् समाज घडवू शकतो : उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी
By शोभना कांबळे | Updated: December 11, 2023 16:58 IST2023-12-11T16:58:15+5:302023-12-11T16:58:56+5:30
सुब्रम्हनीय भारती यांचा जन्मदिवस ‘भारतीय भाषा दिवस’ म्हणून साजरा

वाचनाने आपण घडतो, अन् समाज घडवू शकतो : उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी
रत्नागिरी : वाचन ही काळाची गरज आहे. वाचाल तर वाचाल हे खऱ्या अर्थाने बरोबर आहे. वाचनाने आपण घडतो आणि समाज घडवू शकतो, असे मत निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी कार्यालय आणि कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे सुब्रम्हनीय भारती यांचा जन्मदिवस ‘भारतीय भाषा दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, प्रा. समीर गडबडे, प्रा. डॉ. शंकर जाधव, प्रा. महेंद्र शिंदे, प्रा. प्राजक्ता कदम, कोमसापचे केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे, तहसीलदार (सर्वसाधारण) हणमंत म्हेत्रे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी दीपक झोडगे उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी म्हणाले की, पृथ्वीच्या अस्तित्वापासून अनेक सिध्दांत आहेत. त्याचबरोबर अनेक प्रश्नांची उकलही झालेली नाही. आज सहजपणे मिळालेल्या गोष्टींसाठी पूर्वी खूप झगडायला लागले आहे, संघर्ष करावा लागला आहे. जनावरांनाही हक्क आहे, इथपर्यंत प्रगल्भता वाढलेली आहे. २५ वर्षापुढील जग कसे असेल यावर लिहितो, वाचतो. वाचनाने आपण घडतो आणि समाज घडवू शकतो. या सर्वांचा पाया पुस्तक आहे. वाचन संस्कृती आणि भाषा वृध्दींगत करण्याचे काम करा, असेही ते म्हणाले.
प्रा. कदम म्हणाल्या की, वेस बदलली की, भाषा बदलते. भाषेत भिन्नता असली तरी भारतीय संस्कृती एक आहे. नाटक, संगीत, साहित्य यामधून विविध भाषांची गोडी लावता येईल. भाषा शिकणं, हा उत्सव होऊ शकतो. शिक्षण जरी मातृभाषेत असले, तरी इतर भाषांचा सन्मान हा करायला हवा, असे त्या म्हणाल्या.
जिल्हा नियोजन अधिकारी मुळे आणि जिल्हा पुरवठा अधिकारी राेहिणी रजपूत यांनी मनोगत व्यक्त करुन कार्यक्रमाचा समारोप केला. माधव अंकलगे यांनी कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन केले. तसेच तहसीलदार हणमंत म्हेत्रे यांनी प्रास्तविक केले. यावेळी छोटेखानी ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले होते. कार्यक्रमाला ग्रंथपाल, विद्यार्थी उपस्थित होते.