चिपळुणात कडक ‘वीकेंड लॉकडाऊन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:30 IST2021-04-11T04:30:36+5:302021-04-11T04:30:36+5:30
फोटो - चिपळूण शहरातील चिंचनाका येथे पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जात होती. (छाया : संदीप बांद्रे) फोटो - चिपळूण ...

चिपळुणात कडक ‘वीकेंड लॉकडाऊन’
फोटो - चिपळूण शहरातील चिंचनाका येथे पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जात होती. (छाया : संदीप बांद्रे)
फोटो - चिपळूण बाजारपेठ पूर्णतः सुनीसुनी झाली होती. (छाया : संदीप बांद्रे)
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या वीकेंड लॉकडाऊनमुळे शनिवारी चिपळूणची संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद होती. यानिमित्ताने शहर व परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सर्वच दुकाने व व्यवसाय बंद असल्याने बाजारपेठ सुनीसुनी दिसत होती. तरीही काही दुचाकीस्वार व वाहनधारक अत्यावश्यक वस्तूंच्या नावाखाली बाहेर पडल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
दोन दिवसांच्या संचारबंदीत नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने आधीच केले होते. तसेच नगर परिषदेनेही शहरात रिक्षा फिरवून बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना व नागरिकांना दोन दिवसांच्या कडक लॉकडाऊनविषयी आवाहन केले होते. त्याला शनिवारी येथील व्यापारी व नागरिकांनी तितक्याच उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. बाजारपेठेत मेडिकलचे दुकान वगळता अन्य सर्व दुकाने बंद होती.
पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी बॅरिकेट्स उभारून सर्व सीमा सील केल्या आहेत. तसेच शहरातील उक्ताड, नाईक कंपनी बाजारपूल, फरशी तिठा, चिंचनाका, पाग देसाई बाजार, बहाद्दूरशेख नाका या ठिकाणी तंबू उभारून पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.
दुपारच्या वेळी काही नागरिक अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली बाहेर पडल्याने त्यांच्यावर कारवाई केली. विशेषतः चिंचनाका येथे १५ हून अधिक वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या नेतृत्वाखाली सर्वत्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते.
चौकट
एस. टी. कर्मचाऱ्यांचे झाले हाल
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील एस. टी. बस सेवा पूर्णतः बंद ठेवली होती. केवळ रत्नागिरी, खेड व पोफळी या मार्गावर ही सेवा कंपनीतील कामगारांच्या दृष्टीने सुरू होती. तसेच लांब पल्ल्याच्या बुकिंग असलेल्या काही फेऱ्या सुरू होत्या. त्यासाठी सर्व चालक व वाहकांना कामावर बोलावण्यात आले होते. मात्र, लांब पल्ल्याच्या काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या. तसेच स्थानिक पातळीवर सुरू ठेवलेल्या सेवेलाही अतिशय कमी प्रतिसाद मिळाला. त्यामुळे एस. टी. कर्मचाऱ्यांचीच बस स्थानक परिसरात गर्दी झाली होती. हॉटेल व अन्य दुकाने बंद असल्याने या कर्मचाऱ्यांचे हाल झाले.