The storm hit Ratnagiri district, causing damage by falling trees in some places | Cyclone Nisarga: वादळी वाऱ्याचा रत्नागिरी जिल्ह्याला तडाखा, ठिकठिकाणी झाडं कोसळुन नुकसान

Cyclone Nisarga: वादळी वाऱ्याचा रत्नागिरी जिल्ह्याला तडाखा, ठिकठिकाणी झाडं कोसळुन नुकसान

ठळक मुद्देवादळी वाऱ्याचा रत्नागिरी जिल्ह्याला तडाखा, ठिकठिकाणी झाडं कोसळुन नुकसानरत्नागिरीत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस; विद्युत प्रवाह खंडीत

रत्नागिरी : रत्नागिरी किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळाचे आगमन झाले असून सध्या मोठ्या प्रमाणावर  जोरदार पावसासह प्रचंड वेगाने वारे वाहत आहेत. मंगळवारी मध्यरात्रीपासूनच वेगाने वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी विद्युत प्रवाह खंडीत झाला आहे.

जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस सुरु असून खबरदारी म्हणून महावितरणने विज पुरवठा खंडित केला आहे.

वादळी वाऱ्याने रत्नागिरी, गणपतीपुळे, भोके, दापोली, संगमेश्वर तालुक्यात अनेक ठिकाणी झाडं कोसळून मोठे नुकसान झाले आहे. रत्नागिरीत रस्त्यावरील भली मोठी होर्डिंग्स वाऱ्याने रस्त्यावर कोसळली आहेत.

जिल्ह्यातील वाऱ्याचा वेग वाढत निघाला असून नागरिकांनी कोणत्याही करणासाठी घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.

देवरुख आणि संगमेश्वरात झाडं कोसळून नुकसान

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर वाहत असलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे संगमेश्वरजवळच्या डिंगणी कोंडवीवाडीतील ग्रामस्थ राजाराम खांबे यांच्या घरावर झाड पडून घराचे मोठे नुकसान झाले आहे, जैतापूर आगरवाडी येथील धोंडु धुळाजी पंगेरकर यांच्या घराचे, पडवीचे नुकसान झाले आहे, तर देवरुख जवळच्या हरपुडे मराठवाडी येथील श्री केदारेश्वर मंदिरालगत असलेल्या गायकवाड यांच्या घरासमोरील फणसाचे झाड विजेच्या खांबावर कोसळल्याने विजेच्या तारा तुटल्या आहेत. सुदैवाने विज पुरवठा खंडित असल्याने दुर्घटना घडली नाही. तालुक्यात अनेक ठिकाणी पडझड झाली आहे मात्र सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.

Web Title: The storm hit Ratnagiri district, causing damage by falling trees in some places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.