पावसाचा शिडकावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:23 IST2021-06-01T04:23:30+5:302021-06-01T04:23:30+5:30
दापोली : तालुक्यात रविवारी पावसाने शिडकावा केल्याने वातावरणात काहीअंशी गारवा निर्माण झाला. गेल्या काही दिवसांपासून उष्णतेत मोठ्या प्रमाणावर वाढ ...

पावसाचा शिडकावा
दापोली : तालुक्यात रविवारी पावसाने शिडकावा केल्याने वातावरणात काहीअंशी गारवा निर्माण झाला. गेल्या काही दिवसांपासून उष्णतेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. मात्र, आता अधुनमधून पावसाचा शिडकावा होऊ लागला आहे. काहीवेळा मळभ असल्याने उष्णता वाढू लागते.
वंचितांना संधी
रत्नागिरी : कोरोनाच्या अनुषंगाने राष्ट्रीय अन्नसुरक्षा, शेतकरी योजनेंतर्गत समाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना मे ते ऑगस्ट या चार महिन्यांच्या कालावधीत सवलतीच्या दराने धान्य वाटपाचा निर्णय घेण्यात आला होता. या लाभापासून काही कार्डधारक वंचित होते. मात्र, त्यांना धान्य उचलीसाठी संधी देण्यात आली आहे.
खासगी बसवर कारवाई
राजापूर : कोरोनाच्या अनुषंगाने ई-पास सक्तीचा असूनही तसेच प्रवाशांची कोरोना चाचणी न करता प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या एका खासगी आराम बसमालकासह अन्य दोघांवर नाटे पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलीस काॅन्स्टेबल संभाजी कदम यांनी तक्रार दाखल केली होती.
पेन्शन अदालत
रत्नागिरी : टपाल विभागातील निवृत्त वेतनधारक, कुटुंब निवृत्तीधारकांसाठी २१ जून रोजी सकाळी ११ वाजता पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्र पणजी यांच्या कार्यालयात पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. संबंधितांनी १ जूनपूर्वी आपले अर्ज शिवकुमार शर्मा, पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्र पणजी या पत्त्यावर अर्ज पाठवावेत.
निर्जंतुकीकरण मोहीम
रत्नागिरी : तालुक्यातील गुंबद ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रात निर्जंतुकीकरण मोहीम नुकतीच राबवली. गावातील दोन ग्रामस्थ कोरोनाबाधित सापडताच गुंबद ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रात पुन्हा निर्जंतुकीकरणाची मोहीम राबवली. सरपंच उषा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली गेली.
विमा कवचापासून वंचित
दापोली : सध्या कोरोनाची महामारी वाढत आहे. आरोग्य विभागात अपुरे मनुष्यबळ असल्याने राष्ट्रीय आरोग्य अभियानातून कंत्राटी पद्धतीने अनेक पदे भरण्यात आली आहेत. मात्र, या कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने अजूनही कोरोना सुरक्षा विमा कवच देण्यात आलेले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
पाणीटंचाई तीव्र होऊ लागली
खेड : उन्हाळा तीव्र होऊ लागताच तालुक्यातील ग्रामीण भागात पाण्याच्या टंचाईनेही भीषण रूप धारण करण्यास सुरूवात केली आहे. तालुक्यातील २० गावांमधील ३७ वाड्यांना पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवू लागले आहे. माणसांबराेबरच पाळीव जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचेही मोठ्या प्रमाणावर हाल झाले आहेत.
मोबाईल व्हॅनमधून लस
रत्नागिरी : रत्नागिरी शहरात मोबाईल व्हॅनमधून दिव्यांग व्यक्तींसाठी लसीकरण सुरू झाले असून, या केंद्राला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, आता जे ज्येष्ठ नागरिक लसीकरण केंद्रांपर्यंत जाऊ शकत नाहीत, अशांसाठीही मोबाईल व्हॅनमधून लसीकरण करण्यासाठी प्रशासनाकडून परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे लसीकरण सुयोग्य पद्धतीने होणार आहे.
शेतकऱ्यांना दिलासा
दापोली : ब्रेक द चेन अंतर्गत लाॅकडाऊन अधिक कडक करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, सध्याचा खरीप हंगाम लक्षात घेऊन कृषिविषयक सेवा देणारी दुकाने अधिक काळ सुरू ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. मात्र, ही दुकाने अधिक वेळ सुरू असली तरी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन खरेदीसाठी शेतकऱ्यांना गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गरजूंना धान्य वाटप
रत्नागिरी : कोरोनाच्या काळात आर्थिक संकटात आलेले गरीब वयोवृद्ध, मोलमजुरी करून त्यावर गुजराण करणारे मजूर, निराधार, बेरोजगार यांना सहाय्य व्हावे, या उद्देशाने रिलायन्स फाऊंडेशन आणि पाटीदार युवा मंडळ या सामाजिक संस्थेकडून धान्याचे वाटप करण्यात आले. रिलायन्स फाऊंडेशनच्यावतीने देशभर हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.