लांजा : तालुक्यातील मठ - कडूवाडी येथील काेराेना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ग्रामस्थांनी स्वॅब देण्यास नकार दिल्याने आराेग्य यंत्रणेसमाेर प्रश्न निर्माण झाला हाेता. काेराेना चाचणीबाबत असणाऱ्या गैरसमजातून ग्रामस्थांनी नकार दिल्याने त्यांच्या मनातील गैरसमज दूर करण्यात आले तसेच त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आल्यानंतर वाडीतील सर्वच ग्रामस्थांनी स्वॅब देण्याची तयारी दर्शवत काेराेना चाचणी करून घेतली.
मठ - कडूवाडी येथे कोरोना रूग्णांच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या ग्रामस्थांचे कोरोना स्वॅब घेण्यासाठी शनिवारी आरोग्य विभागाचे कर्मचारी गेले हाेते. मात्र, ग्रामस्थांनी स्वॅब देण्यास नकार दिल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मारुती कोरे यांच्याशी संपर्क साधून याची माहिती दिली. डॉ. कोरे, लांजा प्रांताधिकारी पोपट ओमासे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण देशमुख यांनी मठ - कडूवाडी येथे भेट दिली. यावेळी येथील ग्रामस्थांनी आम्हाला देवधे येथील कोरोना केअर सेंटर येथे ठेवण्यात येऊ नये, आम्हाला गावामध्येच शाळेत विलगीकरण करुन उपचार करावेत, अशी मागणी केली.
यावेळी ग्रामस्थांच्या मनामध्ये असलेले गैरसमज व शंकांचे निरसन करण्यात आले तसेच वेळेत कोरोना चाचणी केली तर लवकर उपचार होऊन लवकर बरे व्हाल, असे सांगण्यात आले. ज्या ग्रामस्थांचे अहवाल निगेटिव्ह येतील त्यांचा काहीच प्रश्न नाही, अशी समजूत काढल्यानंतर कोरोना चाचणी करुन घेण्यास ग्रामस्थांनी तयारी दर्शवली. वाडीतील २१ ते ५० वर्ष वयोगटातील ४७ ग्रामस्थांची यादी करुन आरोग्य विभागाकडे शनिवारी दिल्यानंतर रविवारी कोरोना चाचणी करण्यात आली.