कुरधुंडा - साेनगिरी मार्गावर मातीच माती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:29 IST2021-05-24T04:29:29+5:302021-05-24T04:29:29+5:30
देवरुख : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ची पहिल्याच पावसात दैना झाली आहे. चाैपदरीकरणाच्या सुरु असलेल्या कामामुळे संगमेश्वरनजीकच्या ...

कुरधुंडा - साेनगिरी मार्गावर मातीच माती
देवरुख : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ची पहिल्याच पावसात दैना झाली आहे. चाैपदरीकरणाच्या सुरु असलेल्या कामामुळे संगमेश्वरनजीकच्या कुरधुंडा - सोनगिरी मार्गावर मातीच माती पसरली होती तर महामार्ग काळ्याचा लाल झाला असून, वाहनचालकांचे हाल हाेत आहेत.
मुंबई - गोवा महामार्गाचे काम सुरु असून, कोणत्याही पद्धतीचे नियोजन नसून कुठूनही खोदून कुठेही माती टाकली जात आहे, गटारे बुजवली गेली आहेत. पावसाचे पाणी जाण्यासाठी जागाच शिल्लक राहिली नसल्याने खोदलेली माती पाण्यासहीत महामार्गावर आली असून, काळा दिसणारा महामार्ग काही दिवस लालच लाल दिसत होता. राष्ट्रीय महामार्ग कामाचा ठेका एम. ई. पी. कंपनीने घेतला असून, त्यांचे सबठेकेदार जे. एम. म्हात्रे कंपनी असून, बेजबाबदारपणे ही कंपनी आरवली ते बावनदी दरम्यान काम करत असल्याची लेखी तक्रार कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग, रत्नागिरी यांना करूनही त्याच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पावसाआधीच महामार्गावर येणारे पाणी आणि कंपनीने केलेल्या ढिसाळ कामामुळे महामार्गावर येणाऱ्या मातीचे योग्य ते नियोजन करण्याचे लेखी पत्रही संबंधित विभागाला देण्यात आले होते. मात्र, कार्यकारी अभियंत्यांनी रस्त्याची पाहणी केलेली नाही.
महामार्गावर आलेल्या मातीमुळे दोन दिवसात किरकोळ अपघातसुद्धा झाले असून, काहींना दुखापत झाली आहे. मोठ्या पावसात जर टाकलेल्या मातीला व्यवस्थित दगड किंवा सिमेंट पिशवीत माती भरून लावल्या नाहीत तर महामार्ग लाल मातीमय होऊन महामार्गावर अपघातांची मालिका सुरू होईल, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.