खवल्या मांजराची तस्करी; तिघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 16:25 IST2021-02-10T16:24:17+5:302021-02-10T16:25:47+5:30
Crimenews ForestDepartment Ratnagiri- मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात मौजे भोगाव खुर्द (ता. पोलादपूर) येथे वन विभागाने धडक कारवाई करत खवले मांजरासह तिघांना ताब्यात घेतले आहे. हे तिघेही चिपळुणातील असून, त्यात एका रिक्षा व्यावसायिकाचाही समावेश आहे.

खवल्या मांजराची तस्करी; तिघे ताब्यात
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात मौजे भोगाव खुर्द (ता. पोलादपूर) येथे वन विभागाने धडक कारवाई करत खवले मांजरासह तिघांना ताब्यात घेतले आहे. हे तिघेही चिपळुणातील असून, त्यात एका रिक्षा व्यावसायिकाचाही समावेश आहे.
रोहा येथील सहायक वनसंरक्षक विश्वजित जाधव यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून वनरक्षक अजिंक्य कदम, मंगेश पव्हरे, योगेश देशमुख, वाहन चालक राजेश लोखंडे आदी कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. खवल्या मांजर मादी एका पिलासह पोत्यात भरून (एमएच ०८, एक्यू ४४४१) या रिक्षातून वाहतूक करण्यात येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार मौजे भोगाव खुर्द येथे ही रिक्षा आल्यानंतर त्या रिक्षाची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये विक्रीसाठी नेण्यात येणारे खवले मांजर आढळले.
या कारवाईत रिक्षाचे मालक व चालक नरेश प्रकाश कदम (रा. कालुस्ते, ता. चिपळूण), सागर श्रीकृष्ण शिर्के (रा. चिवेली, ता. चिपळूण), सिकंदर भाई साबळे (रा. वाघिवडे, ता. चिपळूण) यांच्यावर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्हेकामी महाड वनपरिक्षेत्रातील वनरक्षक शरद धायगुडे, संदीप परदेशी, रोहिदास पाटील, प्रकाश पवार, गौतम इहावळे, जंगम मेजर, मच्छिंद्र देवरे, प्रकाश जाधव, नवनाथ मेटकरी यांनी योग्य ती मदत केली. या प्रकरणाचा पुढील तपास रोहा येथील सहायक वनसंरक्षक करीत आहेत. गेले काही महिने हे प्रकार थोडे थांबले होते. मात्र आता ते पुन्हा सुरू झाले आहेत.