स्मार्ट सिटी,फोल्डींग सायकल विज्ञान प्रदर्शनातील आकर्षण
By Admin | Updated: January 19, 2015 00:24 IST2015-01-18T23:10:51+5:302015-01-19T00:24:09+5:30
अखंड भारत स्वच्छता व गांधी जयंतीच्या ‘खेड्याकडे चला’ या संदेशाची प्रचिती आल्यावाचून राहत नाही.स्मार्ट सिटी किंवा गाव कसे असावे, तसेच कचरा निर्मूलन किंवा व्यवस्थापन यावर सर्वाधिक भर देण्यात आला होता

स्मार्ट सिटी,फोल्डींग सायकल विज्ञान प्रदर्शनातील आकर्षण
रत्नागिरी : ‘चिरंतन विश्वासाठी गणित आणि विज्ञान’ थिम घेऊन, आयोजित करण्यात आलेल्या ४० व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे लक्ष्य स्मार्ट सिटी कचरा व्यवस्थापन, फोल्डींग सायकल आकर्षण ठरत आहे.
मुख्य द्वारावर उभा असलेला रोबोट सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. पाहुण्यांना नमस्कार किंवा हस्तांदोलन हे त्याचे खास आकर्षण होते. याशिवाय, फोल्डींग सायकल हा तर कुतूहलाचा विषय होता. महाविद्यालयाच्या तीन मजली इमारतीतील प्रत्येक खोलीतून ४३६ विविध प्रकल्प सादर करण्यात आले. दुषीत हवा शुद्धीकरण उपक्रम या प्रयोगातून गावातील, शहरातील, कारखान्यातील दुषीत हवेचे शुद्धीकरण कसे करता येईल, याचे विश्लेषण करण्यात आले होते. बोअरवेलमध्ये अडकलेले मुल फुग्याचा वापर करुन, कसे बाहेर काढता येईल यासाठी बालवैज्ञानिकांनी कल्पकतेने उपकरण मांडले होते. रेल्वेस्टेशनवरील अस्वच्छता दूर करण्यासाठी रेल्वेमध्ये स्टेशन येण्यापूर्वीच, सायरनचा वापर करुन स्टेशनमधून गाडी सुटेपर्यंत प्रसाधन गृहांचा वापर करता येणार नाही. जेणेकरुन प्रवाशांना याची जाणीव होईल व पर्यायाने स्थानक स्वच्छ राहिल.गृहिणींना घरच्या घरी व्यायाम करत असतानाच, घरातील अन्य कामेही कशी सुलभ होतील हे सांगण्यासाठी एक्सल बाईक कम वॉशिंग मशीन हे उपकरण मांडण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या उपक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या अखंड भारत स्वच्छता व गांधी जयंतीच्या ‘खेड्याकडे चला’ या संदेशाची प्रचिती आल्यावाचून राहत नाही.स्मार्ट सिटी किंवा गाव कसे असावे, तसेच कचरा निर्मूलन किंवा व्यवस्थापन यावर सर्वाधिक भर देण्यात आला होता. जेणेकरुन स्वच्छता राखण्यास हातभार लागेल. लोकसंख्या शिक्षणांतर्गत शिक्षकांनीही विविध प्रयोग मांडले होते. त्यामध्ये एडस् जनजागृती, शिक्षण करी देशाचे रक्षण, व्यसनाचे दुष्परिणाम, स्वच्छता व आरोग्य, अंधश्रद्धा निर्मूलन, मुलगी वाचवा हो आदी प्रयोग मांडून, त्यामधून सर्व जनतेस सामाजिक संदेश देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)
घनकचरा निर्मूलन करीत असतानाच, कचऱ्याचे विघटन करुन बायोगॅस, विद्युत निर्मिती तसेच गटारे व उद्योगाच्या सांडपाण्यांचे शुद्धीकरण तसेच, पुर्नवापर काच व कागद निर्मुलन त्याचा पुर्नवापर कसा करता येईल, हे प्रयोगातून मांडून संसर्गजन्य रोगाच्या प्रसारावर कसा प्रतिबंध होईल, हे मांडण्यात आले होते. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी मजूर तसेच जनावरांचा वापर न करता, आधुनिक शेतीयंत्र वापरले तर, कमी वेळेत व कमी खर्चात शेतीची कामे कशी सोपी होतील, हे आधुनिक शेती यंत्राद्वारे मांडण्यात आले होते. ज्या यंत्राद्वारे पेरणी, नांगरणी, खुरपणी, खते टाकणे तसेच फवारणीची कामे एकाच यंत्राने शक्य आहे.
विद्यार्थ्यांना साध्या सोप्या भाषेत व खेळातून विज्ञान विषयाची आवड, गोडी निर्माण होण्यासाठी उपयुक्त असे, शैक्षणिक साहित्य वापरून ‘जीवनसत्वाची सापशिडी’ मांडण्यात आली होती. या खेळातून जीवनसत्वांचा स्रोत व त्याअभावी होणारे दुष्परिणाम, यांची माहिती समजण्यासाठी सोप्या तंत्राचा अवलंब करण्यात आला आहे.
वाहनांचे गगनाला भिडलेले दर, तसेच इंधनांचे वाढते दर यावर उपाय म्हणून, पवन उर्जेवर चालणारी वाहने, सोलर, स्ट्रीट लाईट उपकरण मांडण्यात आले. नैसर्गिक आपत्ती, महापूर येण्यापूर्वी, त्याबाबतचे सुचक यंत्र तसेच एटीएम मशिनमध्येही होणारा चोरीचा प्रयत्न रोखण्यासाठी मोबाईलचा वापर कल्पकतेने करुन, त्याची कल्पना शाखा व्यवस्थापकास होऊन त्यांच्याव्दारे पोलिसांच्या मदतीने चोरांना लागलीच पकडणे शक्य होणार आहे.