भरपाई वाटपाची गाडी हळूहळू रूळावर
By Admin | Updated: March 2, 2016 01:32 IST2016-03-02T01:31:46+5:302016-03-02T01:32:06+5:30
जिल्हा प्रशासन : ७१ हजार ८१२ शेतकऱ्यांना लाभ

भरपाई वाटपाची गाडी हळूहळू रूळावर
रत्नागिरी : जिल्ह्यातील आंबा बागायतदारांच्या नुकसान भरपाई वाटपाला वेग आला आहे. शासनाने हमीपत्र स्वीकारण्याचे आदेश प्रशासनाला दिले असल्याने आता सामायिक खातेदारांच्या नुकसान भरपाई वाटपाची गाडी आता रूळावर येऊ लागली आहे. आतापर्यंत ७१,८१२ शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आली आहे.
२८ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत झालेल्या अवेळी पावसाने जिल्ह्यातील शेतीपीक आणि फळपिकांचे नुकसान झाले होते. या अवेळी पावसामुळे जिल्ह्यातील विविध फळपिकाअंतर्गत ५० टक्के एकत्रित रब्बी पिकाखालील क्षेत्र बाधित झाले होते. यात २०७१८.२० हेक्टर क्षेत्रावरील आंबापीक बाधित झाले, तर ११०९६.४१ हेक्टर क्षेत्रावरील काजूपिकाचे नुकसान झाले आहे. या दोन्ही पिकांचे नुकसान झालेल्या खातेदारांंची एकूण संख्या ६४,८७४ इतकी आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात ३,१८,३४० इतके शेतकरी असून २०,०७१ एकेरी खातेदार आहेत, तर २,९८,२६९ इतके सामायिक खातेदार आहेत. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक २०,००१ इतके एकूण खातेदार असून, सामायिक १६,५११ तर वैयक्तिक खातेदार ३४९० आहेत. काही खातेदार अन्य ठिकाणी गेल्याने त्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणे अवघड होत होते. काही खातेदारांकडून चुकीचे खातेक्रमांक आल्याने भरपाईची रक्कम खात्यावर जमा होण्यात अडचणी येत होत्या. कोकणात अनेक ठिकाणी ही समस्या निर्माण झाली होती. याबाबत प्रशासनाकडे तक्रारीही आल्या होत्या.
कोकणात सामाईक मिळकत असल्याने ही समस्या उभी राहिली होती. नुकसानभरपाई कोणाच्या खात्यावर जमा करायची? असा प्रश्न उपस्थित झाला. मुख्य म्हणजे सातबारा उताऱ्यावर एकापेक्षा जास्त खातेदारांची नावे असल्याने सामायिक खातेदारांच्या खात्यावर रक्कम जमा होताना अडचणी येत होत्या. याबाबत बागायतदारांनी हमीपत्र स्वीकारून भरपाईची रक्कम देण्याची मागणी उचलून धरली होती. याबाबत विविध स्तरावर विचारविनिमय करण्यात आला.
याप्रकरणी पालकमंत्री रवींद्र वायकर तसेच इथले स्थानिक नगरसेवक यांनीही ही हमीपत्राबाबत आग्रह धरल्याने ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत गेली. अखेर शासनाने या मागणीचा विचार करून सामायिक खातेदारांना हमीपत्रावर भरपाई देण्याची मागणी मान्य केल्याने अखेर भरपाई वाटपातील मोठा अडथळा दूर झाला आहे.
मुळात कृषी विभागाकडील भरपाई वाटपाची जबाबदारी महसूल विभागाकडे देण्यात आली असली तरी महसूल विभागाकडे असलेला रिक्त पदांचा अनुशेष पाहता आहे त्याच कर्मचाऱ्यांवर ही भरपाईवाटपाची जबाबदारी देण्यात आली आहे. तालुक्यातील नुकसानग्रस्त बागायतदारांची संख्या लक्षात घेता या कर्मचाऱ्यांनाच ही अतिरिक्त जबाबदारी पेलावी लागत आहे. त्यामुळे वाटपाच्या गतीवरही त्याचा परिणाम होत असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
तालुका शेतकरी वाटप करावयाचीखातेदार झालेले
संख्याएकूण रक्कमसंख्यावाटप
मंडणगड ५४६४३,८४,४१,०००२७९८१,६८,४५,६४०
दापोली ८०७४३,९०,१८,५०० ५४०३२,५८,५६,५८८
खेड ६६२७३,५२,०१,०००४२१२१,७५,७१,२३५
चिपळूण ४५०७४४९५८५००८७४४२,५६,०३,८८९
गुहागर ३८८६७२९५०२५०१०४१०२,७३,६७,२७३
संगमेश्वर १२४०८१३८५२२५००६२७८४,५९,१७,०११
रत्नागिरी १०७७५१६८१६१००० २०००११०,४१,०९,२७८
लांजा १०२४५१३६६११७५०६२९३५,३३,६२,९८५
राजापूूर २८८८१२१५१०५००७६७३४,७७,७८,३३९
एकूण ६४,८७४७९५३७५०००३१८३४०३६,४४,१२,२३८
प्रश्न निकाली
सामायिक खातेदार असल्याने जिल्ह्यात नुकसानभरपाईचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र यावरही शासनाने तोडगा काढल्याने आता भरपाईचा प्रश्न तात्पुरत्या स्वरुपात का होईना; परंतु निकाली निघाला आहे.