रत्नागिरीवासीय पितात सांडपाणीमिश्रित पाणी

By Admin | Updated: November 17, 2015 00:01 IST2015-11-16T21:34:58+5:302015-11-17T00:01:58+5:30

रत्नागिरी : बंड्या साळवी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधणार

Sewer water mixed with Ratnagiri | रत्नागिरीवासीय पितात सांडपाणीमिश्रित पाणी

रत्नागिरीवासीय पितात सांडपाणीमिश्रित पाणी

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील जुनाट जलवाहिन्या जागोजागी फुटलेल्या आहेत. या फुटलेल्या जलवाहिन्यांमध्ये गटारातील सांडपाणी मिसळत असून, हेच दूषित पाणी रत्नागिरीकरांना प्यावे लागते. त्यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या जलवाहिन्या तातडीने बदलाव्यात व शहरवासीयांना आरोग्यदायक पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी करणारे निवेदन पालिकेतील शिवसेनेचे पक्षप्रतोद प्रदीप तथा बंड्या साळवी जिल्हाधिकाऱ्यांना येत्या दोन दिवसात देणार आहेत.
रत्नागिरी शहरात गटारे, रस्ते, उद्याने यांसारख्या अनेक बाबतीत नागरिकांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. या समस्यांकडे गेल्या वर्षभराच्या काळात सातत्याने दुुर्लक्ष होत असल्यानेच आपल्याला याबाबत आवाज उठविणे भाग पडत असल्याची माहिती नगरसेवक साळवी यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
रत्नागिरी शहरात साडेनऊ हजारपेक्षा अधिक नळजोडण्या असून, दररोज शीळ व पानवल धरणातून शहराला १५ दशलक्ष घनमीटर पाणी पुरवठा केला जातो. शीळ धरणातून सर्वाधिक १२ दशलक्ष घनमीटर पाणीपुरवठा केला जातो. पाण्याचा साठा मुबलक असताना गेल्या काही वर्षांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होणे, काही ठिकाणी पाणीच न येणे, किडेयुक्त, दुर्गंधीयुक्त पाणी येणे या समस्यांनी रत्नागिरीतील नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या सहा महिन्यांच्या काळात शहरातील अनेक भागातील नळांना सांडपाणीमिश्रित पाणी येत असून, त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, आरोग्याच्या समस्या उद्भवायला लागल्या आहेत. जुनाट जलवाहिन्यांचे जाळे बदलण्याचा विषय अनेक दिवसांपासून सुरू असताना व त्यासाठी निधीची उपलब्धता होऊनही कार्यवाही झालेली नाही. शहराच्या अनेक भागातील अंतर्गत जलवाहिन्या जुनाट असल्याने फुटलेल्या आहेत. त्यामुळे गटारातील सांडपाणी फुटलेल्या जलवाहिनीत शिरते व हे सांडपाणीयुक्त पाणी नळजोडण्यांमधून नागरिकांना मिळते. याबाबत नागरिकांच्या वारंवार तक्रारी आपल्याकडे आल्या असून, याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधणार असल्याचे साळवी यांनी स्पष्ट केले आहे. रत्नागिरीकर सध्या अनेक समस्यांना सामोरे जात असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

मुबलक पाणी : तहान भागेना...
रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात आॅगस्ट २०१६पर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आहे. पानवल धरणातील पाणी फेबु्रवारीअखेरपर्यंत वापरले जाते. त्यानंतर या धरणातील पाणी आटते. एमआयडीसीकडून पाणी घेतले जाते. म्हणजेच पाणीपुरवठा मुबलक असताना शहरवासीयांना मात्र पुरेसे पाणी मिळत नाही, याचे कारण तांत्रिक आहे. त्यात सुधारणा होणे अत्यंत आवश्यक आहे.


शुध्दिकरण की...?
शहरातील साळवी स्टॉप येथील जलशुध्दिकरण केंद्र हे कचऱ्याच्या ढिगांच्या विळख्यात आहे. त्यामुळे जलशुध्दिकरणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Web Title: Sewer water mixed with Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.