रत्नागिरी : रत्नागिरी पंचायत समितीचे माजी सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते सुहास वामन तथा कुमार शेट्ये (७० वर्षे) यांचे शुक्रवारी दुपारी रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात निधन झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला.शिरगाव ग्रामपंचायतीचे ते दीर्घकाळ सरपंच होते. त्यानंतर ते रत्नागिरी पंचायत समितीचे सभापतीही होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर त्यांच्याकडे पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदासह विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचेही ते कार्यकारिणी सदस्य होते. अखेरपर्यंत त्यांची निष्ठा शरद पवार यांच्यावर होती. १९९५ साली काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराविरोधात त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि अधिकृत उमेदवारापेक्षा अधिक मते मिळवली. १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांनी ही निवडणूक लढवली होती.रत्नागिरीचे विद्यमान आमदार आणि मंत्री उदय सामंत यांच्या राजकीय जडणघडणीमध्ये कुमार शेट्ये यांचा महत्त्वाचा वाटा होता. अलीकडे शेट्ये यांची प्रकृती नाजूक बनली होती. त्यांना मधुमेह आणि हृदयविकाराचाही त्रास होता. त्यासाठी रत्नागिरीसह मुंबई आणि पुण्यात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पुण्यातील उपचार झाल्यानंतर ते काही दिवसांपूर्वी रत्नागिरीत आले होते. रत्नागिरीत एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून आणि कन्या असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने एक सहृदय राजकीय नेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
शरद पवार यांच्याकडून श्रद्धांजलीराष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी कुमार शेट्ये यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी कुमार शेट्ये यांचे चिरंजीव सूरज शेट्ये यांना तत्काळ पत्र पाठवून श्रद्धांजली वाहिली आहे.