‘रोजगार हमी’ची दुसरी इनिंग सुरू
By Admin | Updated: September 24, 2015 00:11 IST2015-09-23T21:55:12+5:302015-09-24T00:11:38+5:30
रत्नागिरी जिल्हा : ५४१ हेक्टरचे उद्दिष्ट

‘रोजगार हमी’ची दुसरी इनिंग सुरू
रत्नागिरी : गेली दोन वर्षे रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड योजना बंद करण्यात आली होती. रोहयोऐवजी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना सुरू करण्यात आली. मात्र, या योजनेतील जाचक अटीमुळे शेतकऱ्यांचा प्रतिसाद न लाभल्यामुळे शासनाने पुन्हा यावर्षी ‘रोजगार हमी योजनेला’ मान्यता दिली आहे. जिल्ह्यासाठी ५४१ हेक्टर क्षेत्रावर लागवडीस मान्यता देण्यात आली आहे.सन १९९० पूर्वी जिल्ह्यात फळबाग लागवडीखालील क्षेत्र ३८,६४४ हेक्टर होते. मात्र, रोहयोअंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रमाच्या माध्यमातून २०१२-१३पर्यंत जिल्ह्यात १ लाख २६ हजार २७५ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली, त्यामुळे १ लाख ६२ हजार ५४७ हेक्टर क्षेत्र फळबाग लागवडीखाली आले. परंतु २०१३ साली रोहयो योजना बंद करण्यात आली. त्याऐवजी मनरेगा सुरू करण्यात आली. मात्र, योजनेसाठी असलेल्या अटींमुळे शेतकऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. याबाबत ‘लोकमत’ने मालिका प्रसिध्द करून जिल्ह्यातील लागवड परिस्थितीवर प्रकाश टाकला होता. मात्र, पुन्हा शासनाने यावर्षी रोजगार हमी योजनेला मान्यता दिली आहे.रोहयोअंतर्गत लागवडीनंतर शेतकऱ्यांना सलग तीन वर्षे अनुदानाची रक्कम लाभार्थींच्या बँकेच्या खात्यात थेट जमा होणार आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांचा सातबारा, आठ अ, व अर्ज आवश्यक आहे. मात्र, लागवडीसाठीची कलमे शासकीय नर्सरीतूनच विकत घेणे आवश्यक आहे. लागवडीसाठी १० हेक्टरची मर्यादा आहे. लागवडीनंतर अंतर्गत मशागत, खड्डे खोदणे, पाणी घालणे, मृत झाडांच्या ठिकाणी नवीन लागवड करणे, पीक संरक्षक खते देणे यासाठी सलग तन वर्षे पैसे देण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी लागवडीसाठी, क्षेत्र तयार करण्यासाठी आधी स्वत:कडचे पैसे खर्च केल्यानंतर शासन मंजुरीप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे मिळत आहेत. २०१५-१६ वर्षासाठी जिल्ह्यात ५४१ हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. रोहयोअंतर्गत फळबाग लागवडीसाठी आंब्याकरिता ३००, काजू १८०, चिकू १०, नारळ १०, जांभूळ २, कोकम ३, फणस ३, सुपारी २, बांबू १, कातळ जमिनीतील आंबा लागवडीसाठी १०, भातखाचराच्या बांधावर आंबा लागवडीसाठी १० व नारळ लागवडीसाठी ५, नारळबागेतील मसाला पीक लागवडीअंतर्गत मिरी १, लवंग १, जायफळ १, सुपारी २ मिळून एकूण ५४१ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी मंडणगड तालुक्याला ४०, दापोली ७०, खेड ४०, चिपळूण ५०, गुहागर ७०, संगमेश्वर ६०, रत्नागिरी ९१, लांजा ७०, राजापूर तालुक्यात ५० हेक्टर क्षेत्र लागवडीसाठी लक्षांक देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
दोन वर्षे योजना बंद
हवामान, रोजगार निर्मिती व उच्च मूल्यांकित पीक रचना या सर्व बाबींचा विचार यात करण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती साधण्यासाठी तसेच पडिक जमिनीचा विकास करण्याच्या दृष्टीने रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड योजना सुरू करण्यात आली होती.