गणेशोत्सवानंतर शाळांची घंटा वाजणार, आदेशाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:37 IST2021-09-15T04:37:20+5:302021-09-15T04:37:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे गेले दीड वर्षे ऑनलाइन अध्यापन सुरू आहे. कोरोनामुक्त गावातून शाळा सुरू करण्याची सूचना ...

गणेशोत्सवानंतर शाळांची घंटा वाजणार, आदेशाची प्रतीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनामुळे गेले दीड वर्षे ऑनलाइन अध्यापन सुरू आहे. कोरोनामुक्त गावातून शाळा सुरू करण्याची सूचना केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील ६० शाळांमध्ये प्रत्यक्ष अध्यापन सुरू झाले असून, ५,१२१ विद्यार्थी उपस्थित राहत आहेत. सध्या गणेशोत्सवाची सुट्टी असली तरी १५ सप्टेंबरपासून पुन्हा वर्ग भरणार आहेत.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे शासनाने कोराेनामुक्त गावातून शाळा सुरू करण्याची सूचना केली होती. शिवाय शिक्षकांचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्याची सूचना केली आहे. लसीकरणासाठी चांगला प्रतिसाद लाभत असून ८५ टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण पूर्ण झाले आहे. गतवर्षी दिवाळी सुट्टीनंतर नववी ते बारावी व जानेवारीमध्ये पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू केले होते. यावर्षी लसीकरण तातडीने पूर्ण करण्याची सूचना केल्याने गणेशोत्सवाची सुट्टी संपल्यानंतर शाळा सुरू करण्याबाबत शासन निर्णय होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील एकूण ३२०२ शाळांपैकी अवघ्या ६० शाळा सुरू
पालकांमध्ये कोरोनाची भीती अद्याप असल्याने विद्यार्थी उपस्थिती कमी
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर
गणेशोत्सव सुट्टीनंतर शाळा सुरू होण्याबाबत निर्णयाची अपेक्षा
अद्याप सूचना नाही
गणेशोत्सवाची सुट्टी अद्याप सुरू आहे. शिक्षक लसीकरण पूर्ण होत आले असले तरी शाळा प्रत्यक्ष सुरू करण्याबाबत कोणत्याही सूचना शासनाकडून प्राप्त झालेल्या नाहीत. शिक्षक दिनापर्यंत लसीकरण पूर्ण करण्याची सूचना केली होती. त्यामुळे शासन आदेशाबाबत प्रतीक्षा आहे.
ऑनलाइन अध्यापन
जिल्ह्यातील ३१४२ शाळांमध्ये ऑनलाइन अध्यापन अद्याप सुरू आहे. त्यासाठी शिक्षक शाळेत जाऊन ऑनलाइन अध्यापन करीत आहेत. गूगल मीट, गूगल क्लासरूमच्या माध्यमातून अध्यापन सुरू असून ६० शाळांमध्ये मात्र प्रत्यक्ष अध्यापन करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील बहुतांश शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. कोरोनामुक्त गावातून शाळा सुरू करण्याच्या शासन सूचनेनुसार ६० शाळांमध्ये प्रत्यक्ष अध्यापन सुरू आहे. अन्य शाळा सुरू करण्याबाबत मात्र अद्याप शासन निर्णय नाही.
- निशादेवी वाघमोडे, शिक्षणाधिकारी
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करून घेण्यात येत असतानाच शाळा सुरू करण्याबाबत शासन विचाराधीन आहे. शाळा सुरू करताना लसीकरण नाही तर आरोग्य सुरक्षेबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. महाविद्यालयांपूर्वी शाळा सुरू करणे चुकीचे आहे.
- जयेश पवार, पालक